लंडन - येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरीच्या जेतेपदाची लढत एकतर्फी झाली. दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी आपापल्या प्रतिस्पर्धींना पाच-सहा तासांच्या उपांत्य फेरीतील सामन्यात नमवल्यानंतर जेतेपदाचा सामना रोमहर्षक होईल अशी अपेक्षा होती. परंतु, जोकोव्हिचने सर्व तर्क चुकवताना अंतिम लढतीत 6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवला. 2015 नंतर विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद नावावर करण्यात जोकोव्हिचला यश मिळाले. त्याचे हे एकूण 13वे जेतेपद ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रॉच इमरसन यांच्या 12 ग्रँड स्लॅम जेतेपदाचा विक्रम मोडला. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने बाजी मारली. शनिवारी राफेल नदालविरूद्ध चाललेल्या पाच तासांच्या सामन्यानंतरही रविवारी जोकोव्हिच ताजातवाना वाटत होता. त्याने सुरूवातीला संयमी खेळ करताना सर्व्हिसवर गेम जिंकले. त्याने 2-1 अशा आघाडीवर असताना चौथ्या गेममध्ये अँडरसनची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर त्याने सलग दोन गेम घेत 5-1 अशी आघाडी घेतली. अँडरसनने सातवा गेम घेताना सामन्यात रंजकता आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जोकोव्हिचने आठव्या गेमसह हा सेट 6-2 अशा जिंकला. 12 व्या मानांकित जोकोव्हिचसमोर 8 वा मानांकित अँडरसन थकलेला जाणवला. अवघ्या 29 मिनिटांत जोकोव्हिचने विजय मिळवला.दुस-या सेटमध्ये जोकोव्हिचने 2-0 अशा आघाडीसह सामन्यावर पकड घेतली. अँडरसनने तिसरा गेम जिंकला आणि ही पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जोकोने पुढील तीन सेट घेत 5-1 अशी भक्कम आघाडी घेतली. सातव्या गेममध्ये अँडरसनने सर्व्हिस राखली. या गेमसह त्याने एका विम्बल्डन स्पर्धेत सर्वाधिक 332 गेम्स खेळण्याचा विक्रम नावावर केला. पण जोकोव्हिचने आठवा गेम घेत हा सेट 6-2 असा नावावर केला. तोही अवघ्या 42 मिनिटांत...तिस-या सेटमध्ये अँडरसनने अनपेक्षित मुसंडी मारली. त्याने चुकांतून बोध घेताना या सेटमध्ये पहिल्या दोन सर्व्हिस राखण्यात यश मिळवले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखण्यावरच भर दिला. अँडरसनला दहाव्या गेममध्ये जोकोव्हिचची सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी होती. पण जोकोव्हिचने ती राखली आणि गेम 5-5 असा बरोबरीत आणला. पण टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने बाजी मारली. दरम्यान, मुले एकेरीच्या अंतिम फेरीत चायनिज तैपेइच्या चुंग सीन त्सेंग याने बाजी मारली. त्याने ब्रिटनच्या जॅक ड्रॅपरचा 6-1, 6-7 (2/7), 6-4 असा पराभव केला. ड्रॅपरला जेतेपद पटकावून इतिहास घडवण्याची संधी होती. 1962नंतर मुलांच्या गटात ब्रिटनच्या खेळाडूंना जेतेपद पटकावता आलेले नाही. 1962मध्ये स्टॅनली मॅथ्यू यांनी जेतेपदाचा चषक उंचावला होता.