लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले. मात्र इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी फेडररच्या पराभवाचा जल्लोष केला. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने पाच सेटमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत फेडररला पराभूत करताना प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. १९८३ साली केव्हिन कुरेन यांनी विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती आणि त्यानंतर अशी कामगिरी कराणारा अँडरसन हा आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या विजयाचा जल्लोष दूर आफ्रिकेत तर झालाच शिवाय इंग्लंडमध्येही आतषबाजी करून फेडररच्या पराभवाचा आनंद साजरा कराण्यात आला. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना जेतेपद आपलेच या आविर्भावात त्यांचे पाठीराखे होते. त्यात फेडररचा पराभव म्हणजे इंग्लंडचे जेतेपद निश्चित या गोड गैरसमजाने त्यांच्या मनात घर केले. इंग्लंडने १९६६ ला विश्वचषक उंचावला होता आणि त्यानंतर तब्बल ५२ वर्षांनी त्यांना हा सुवर्णक्षण पुन्हा अनुभवण्याची संधी वाटली. १९६६ च्या विम्बल्डन स्पर्धेत गतविजेत्या (१९६५) रॉय इमर्सन यांना उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता आणि त्याच वर्षी इंग्लंडने जेतेपद जिंकले होते.
Wimbledon 2018 : फेडरर हरल्यावर इंग्लंडमध्ये फुटले फटाके; कारण वाचून कपाळावर हात माराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 2:32 PM