ठळक मुद्देमारिया शारापोवा पहिल्याच फेरीत गारद
लंडन : दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये माजी विजेती मारिया शारापोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम आणि नवव्या विम्बल्डन जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने ग्रास कोर्टवरील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना दिमाखदार विजय मिळवला. त्याने लॅकोचे आव्हान ६-४, ६-४, ६-१ असे सहजपणे परतावले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात फेडररने तब्बल १६ एस मारताना लॅकोवर पूर्ण वर्चस्व मिळवले. त्याउलट लॅकोला केवळ ६ एस मारण्यात यश आले. शिवाय दबावाखाली आल्यानंतर लॅकोकडून चारवेळा डबल फॉल्टही झाले. फेडररच्या झंझावातापुढे लॅकोला आव्हानही उभे करता आले नाही. कॅनडाच्या मिलोस राओनिच यानेही अपेक्षित आगेकूच करताना आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनचे आव्हान ७-६(७-४), ७-६(७-४), ७-६(७-४) असे परतावले. सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यानेही विजयी सलामी देताना अमेरिकेच्या टेनीस सेंडग्रेनचा ६-३, ६-१, ६-२ असा पराभव केला. महिलांमध्ये रशियाच्या मारिया शारापोवाला आपल्याच देशाच्या वितालिया दियाचेनको हिच्याविरुद्ध पराभूत व्हावे लागले. तीन तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत वितालियाने स्टार खेळाडू शारापोवाला ६-७(३-७), ७-६(७-३), ६-४ असा धक्का दिला. गेल्या आठ वर्षांमध्ये शारापोवाची ग्रँडस्लॅममध्ये ही सर्वात वाईट कामगिरी आहे. माजी विजेती झेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोवाचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तिला बेलारुसच्या अलेक्झांद्रा सासनोविचने ६-४, ४-६, ६-० असे नमविले.