लंडन : गत चॅम्पियन गार्बाइन मुगुरूजा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत शुक्रवारी बेल्जियमची नवखी खेळाडू आणि ४७ वी मानांकित एलिसन वान यू हिच्याकडून पराभूत झाली. यामुळे महिला एकेरीत आघाडीच्या सहा खेळाडूंपैकी एकच खेळाडू प्रबळ दावेदारात शिल्लक आहे. वान यू ने मुगुरूजाला ५-७, ६-२, ६-१ असे पराभूत केले. अव्वल मानांकित सिमोना हालेप, सातव्या स्थानावरील कॅरोलिना प्लिसकोवा आणि दहावी मानांकित मेडिसन की चढाओढीत कायम आहेत.पुरूष गटात तिसरा मानांकित आणि मागच्यावर्षीचा उपविजेता मारिन सिलिच हा अर्जेंटिनाचा गुड्डो पेला याच्याकडून ३-६,१-६,६-४,७-६,७-५ ने पराभूत झाला. पावसामुळे काल सामने थांबविण्यात येईपर्यंत तो पुढे होता पण सामना सुरू होताच मारिन पराभूत झाला.याआधी राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे पुढील फेरीत पोहोचले. नदालने कझाखस्तानचा मिखाईल कुकुश्किन याच्यावर ६-४, ६-३, ६-४ ने विजय साजरा केला. तो आता आॅस्ट्रेलियाचा अॅलेक्स मिनाऊरविरुद्ध खेळणार आहे. जोकोविचने अर्जेंटिनाचा होरासियो जेबालोस याच्यावर ६-१, ६-२, ६-३ ने विजय नोंदविला. त्याची गाठ पडेल ती ब्रिटनचा २१ वा मानांकित केली एडमन्डविरुद्ध.पाचवा मानांकित अर्जेंटिनाचा ज्युआन मार्टिन डेल पेट्रो याने फेलिसियानो लोपेजचा ६-४, ६-१, ६-२ ने पराभव केला. निक किर्गियोस याने बेल्जियमचा रूबेन बेमेलमेन्स याच्यावर ६-१, ६-४, ६-७, ६-७, ७-५ अशा फरकाने मात केली. अन्य सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर जपानच्या केइ निशिकोरी याने आॅस्ट्रेलियाचा बर्नार्ड टॉमिचला २-६, ६-३, ७-६, ७-५ असे नमविले. (वृत्तसंस्था)
Wimbledon 2018 : गत चॅम्पियन गर्बाइन मुगुरूजाला पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 3:31 AM