विम्बल्डन - वर्षांनंतर टेनीस कोर्टवर परतलेली सेरेना विल्यम्स आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दिशेने वाटचाल करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर खुश होण्याएवजी तिच्या चेह-यावर निराशा दिसत आहे. अश्रु अनावर होत असल्याचे ट्विट तिने केले आहे. कोणत्या गोष्टीमुळे रडावेसे वाटत आहे, हा प्रश्न तिच्या फॉलोअर्संना पडला आहे. सेरेनाला असे का वाटते, चला जाणून घेऊया. प्रेग्नेंसीमुळे सेरेना जवळपास वर्षभर टेनीस स्पर्धेपासून दूर आहे. फ्रेंच ओपनमधून तिने ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन केले. मात्र दुखापतीमुळे तिने स्पर्धेतून माघार घेतली. मुलीला जन्म दिल्यानंतर पुरेशा विश्रांतीनंतर ती पुन्हा कोर्टवर परतली. विम्बल्डन स्पर्धेत ती दोन वर्षांनंतर सहभागी झाली आणि दमदार खेळ करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिस-या फेरीत सेरेनाने फ्रान्सच्या क्रिस्टीना मॅलडेनोव्हीचचा 7-5, 7-6 ( 7-2) असा पराभव केला. मात्र या स्पर्धेत खेळत असताना सेरेनाला तिच्या मुलीपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे मुलगी ऑलिम्पियाची आठवण तिला सतावत आहे. शनिवारी ऑलिम्पिया प्रथमच आपल्या चिमुकल्या पावलावर चालली आणि हा क्षण पाहण्याचे भाग्य सेरेनाच्या नशीबात नव्हते. त्यामुळे सेरेनाला अश्रु अनावर झाले. ऑलिम्पियाने पहिले पाऊल टाकले... मी इथे सराव करत होते आणि तो क्षण मला पाहता आला नाही. त्यामुळे मला रडावेसे वाटत आहे, असे सेरेनाने भावनिक ट्विट केले आहे.
Wimbledon 2018 : सुपरमॉमचं दुःख; मुलीचं पहिलं पाऊल पाहता न आल्यानं सेरेनाला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 7:44 PM