लंडन : गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंका याने शानदार विजय मिळवताना ग्रिगोर दिमित्रोवचा झुंजार पराभव केला आणि विम्बल्डन स्पर्धेत विजयी सुरुवात केला. विशेष म्हणजे पहिला सेट अवघ्या २३ मिनिटांत गमावल्यानंतर वावरिंकाने जबरदस्त पुनरागमन करत सामन्याचे चित्र पालटले.दुखापतीनंतर जागतिक क्रमवारीत २२४व्या स्थानी घसरलेल्या वावरिंकाची कामगिरी गेल्या काही सामन्यांत प्रचंड खालावली. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. मात्र, यंदाच्या विम्बल्डनची चमकदार सुरुवात करताना त्याने अत्यंत झुंजार खेळ करताना दिमित्रोवचे कडवे आव्हान १-६, ७-६(३), ७-६(५), ६-४ असे परतावले. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेनंतर वावरिंकाने मिळवलेला हा केवळ दुसरा ग्रँडस्लॅम विजय आहे.दुसरीकडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालनेही विजयी सलामी देताना इस्त्राइलच्या दुडी सेला याचा ६-३, ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. नदालने केवळ १ तास ५० मिनिटांमध्ये बाजी मारली. महिलांमध्ये तिसरे मानांकन प्राप्त स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझानेही अपेक्षित विजयी कूच करताना ब्रिटनच्या नाओमी ब्रॉडी हिचा ६-२, ७-५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. (वृत्तसंस्था)स्पेनच्या फेलिसियानो लोपेझने विम्बल्डन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, मात्र त्याने कोर्टवर उतरताच दिग्गज रॉजर फेडररच्या सलग सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याचा विश्वविक्रम मोडला. लोपेझ सलग ६६व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत असून फेडररने सलग ६५ ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळल्या आहेत. यंदा फ्रेंच ओपनमध्ये लोपेझने फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
Wimbledon 2018 : वावरिंकाची झुंजार विजयी सलामी; नदालचीही विजयी आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:52 AM