Ash Barty announces retirement : WTA जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू अॅश बार्टी हीने वयाच्या २५ व्या वर्षी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. बार्टीने एक व्हिडीओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना ही धक्का देणारी बातमी दिली. तिने हा निर्णय नेमका का घेतला, याची माहिती या व्हिडीओत दिलेली नाही. पण, लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत सांगणार असल्याचे तिने सांगितले.
''आजचा दिवस माझ्यासाठी कठीण आणि भावनांनी भरलेला आहे, कारण मी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ही बातमी तुमच्यासोबत कशी शेअर करावी हे मला कळत नव्हते, म्हणून मी माझ्या चांगल्या मित्र caseydellacqua ला मला मदत करण्यास सांगितले. या खेळाने मला जे काही दिले त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला अभिमान आणि ज्यांनी मला साथ दिली त्या प्रत्येकाचे आभार, आम्ही एकत्र तयार केलेल्या आयुष्यभराच्या आठवणींसाठी मी नेहमीच ऋणी राहीन,''असे बार्टीने या व्हिडीओत म्हटले आहे.
बार्टीने महिला एकेरी जागतिक क्रमवारीत सलग ११४ आठवडे अव्वल क्रमांक टिकवला आहे आणि अजूनही ती नंबर वनच आहे. पुढील महिन्यात ती २६व्या वर्षी पदार्पण करेल. वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्ती घेणे हे खुपच धक्कादायक आहे, विशेष म्हणजे एखादा खेळाडू जेव्हा कारकीर्दिच्या उंचीवर असतो. बार्टीने २०१९मध्ये फ्रेंच ओपन, २०२१ मध्ये विम्बल्डन व २०२२मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. त्याशिवाय तिच्या नावावर एकेरीची १५ व दुहेरीचे १२ जेतेपद आहेत. बार्टी सक्रीय असताना कोणत्यात महिला खेळाडूला एवढी जेतेपद जिंकता आलेली नाहीत. बार्टीने तिच्या अल्प कारकिर्दीत २ कोटी ३८ लाख २९,०७१ डॉलर बक्षीस रक्कम कमावली आहे. भारतीय चलनात ही रक्कम १८१ कोटी, ३२ लाख ४६,९४५ इतकी होते.
क्रिकेटमध्येही आजमावलाय हात....
बार्टीनं यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपनटेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले होते. बिम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर बार्टीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. २५ वर्षीय बार्टीनं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या विजयासह ४४ वर्षांचा ऑस्ट्रेलियन टेनिसपटूचा दुष्काळ संपवला होता. १९७८साली ख्रिस ओ'निल यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी बार्टी ही पहिलीच ऑसी खेळाडू ठरली होती. २०१४मध्ये बार्टीनं टेनिसमधून ब्रेक घेतला होता. तेव्हा ती महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिट्स संघाकडून खेळली होती. त्यानंतर २०१६मध्ये ती पुन्हा टेनिस कोर्टवर उतरली.