मुंबई : उझबेकिस्तानच्या सबीना शारिपोवा हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सबीनाने तिस-या मानांकीत बेल्जियमच्या यानीना विकमायेर हिचा पराभव करत स्पर्धेत खळबळ माजवली. चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या लढतीत जागतिक क्रमवारीत १९६व्या स्थानी असलेल्या सबीनाने जबरदस्त झुंजार विजय मिळवताना जागतिक क्रमवारीतील माजी १२व्या स्थानावरील विकमायेरला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. एक तास ५६ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात सबीनाने ३-६, ६-४, ६-२ अशी शानदार बाजी मारली. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर सबीनाने अप्रतिम खेळ करताना आपल्याहून सरस असलेल्या विकमायेरला धक्का दिला. पुढील फेरीत सबीनापुढे डालिला जाकुपोविचचे कडवे आव्हान असेल. डालिलाने दणदणीत विजय मिळवताना फ्रान्सच्या एलिज जिमचा ६-३, ६-१ असा फडशा पाडून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, दुहेरी गटात करमन कौर थंडी - प्रांजला यदलापल्ली या भारतीय जोडीला स्लोवाकियाच्या जाकुपोविच आणि रशियाच्या इरीना ख्रोमाचेवा यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह दुहेरी गटात यजमान भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी, एकेरीमध्ये भारताच्या सर्व आशा आता अंकिता रैनावर अवलंबून आहे.
डब्ल्यूटीए टेनिस : सबीना शारिपोवाचा खळबळजनक विजय, तिस-या मानांकीत यानीना विकमायेरचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 10:31 PM