नवी दिल्ली - देशासाठी आशियाड खेळण्याचे सोडून स्वत:चे रँकिंग वाढावे यासाठी अमेरिकन ओपन टेनिस खेळण्यास प्राधान्य देणारा युवा टेनिसपटू यूकी भांबरी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेतून बाहेर झाला आहे.आपली गच्छंती केल्याबद्दल हा युवा खेळाडू नाराज झाला तर अ.भा. टेनिस महासंघाने क्रीडा मंत्रालयाला आवाहन करीत त्याला पुन्हा सहभागी करून घेण्याची विनंती केली आहे. एआयटीएने एकेरीत अव्वल स्थानावर असलेल्या यूकीला आशियाडमधून सूट दिली होती. महासंघाच्या मते रँकिंग गुण मिळविण्यासाठी यूकीने ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा खेळणे आवश्यक आहे. यामुळे दिल्लीच्या या खेळाडूला टोकियो आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळू शकतो.एआयटीएचे सचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले, ‘यूकीबद्दलच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सरकारला आम्ही विनंती केली आहे. यूकी आणि लियांडर पेस या दोघांना टॉप्स योजनेत सहभागी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. टोकियो आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेशासाठी यूकी अव्वल ६४ खेळाडूंमध्ये असावा यासाठीच एआयटीएने यूकीला आशियाडपासून सूट दिली, असे आम्ही सरकारला कळविले आहे.’सरकारने मात्र यूकी पुन्हा डेव्हिस चषकात खेळणार असेल तर त्याच्या नावावर फेरविचार होऊ शकतो, असे एआयटीएला कळविले. यूकी सध्या अव्वल शंभर खेळाडूंमध्ये आहे. कट आॅफ डेटपर्यत त्याने ही रँकिंग टिकविल्यास त्याला पुढे लाभ होईल.
यूकी भांबरी ‘टॉप्स’ योजनेबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:35 AM