राजू काळे / ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि. 19 - मीरा-भाईंदर पालिकेत कार्यरत असलेले डॉ. मकरंद फुलझेले हे पालिकेसह खाजगी रुग्णसेवा देत असल्याने पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा भत्ता रद्द करुन दिलेला भत्ता वसूल करण्याची मागणी वजा तक्रार भाजपा नगरसेविका डॉ. नयना वसाणी यांनी वैद्यकीय विभागाकडे केल्याने त्यांची विभागांतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी त्वरीत मागे घेण्यात यावी, यासाठी डॉ. फुलझेले यांनी अब्रुनुकसान भरपाईपोटी पालिकेला तब्बल १ कोटी २० लाखांची नोटीस धाडली आहे.
वैद्यकीय अधिका-याने पालिकेला पाठविलेली कोटीची नोटीस, ही पालिका इतिहासातील पहिलीच घटना असून त्यावर प्रशासन कोणता निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे. पालिकेने २०१० मध्ये सुरु केलेल्या मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात डॉ. फुलझेले यांची २४ मार्च २०११ रोजी रुग्णालय अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा फुलझेले यांनी केला. मात्र भाजपा नगरसेविका डॉ. वसाणी यांनी फुलझेले खाजगी दवाखाना चालवुन खाजगी रुग्णसेवा देत असल्याची धक्कादायक बाब आणली.
ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार बेकायदेशीर ठरत असल्याने पालिकेकडुन फुलझेले यांना खाजगी रुग्ण सेवा न देण्यापोटी देण्यात येत असलेला एनपीए (नॉ प्रॅक्टीस अलाऊंस) थांबविण्यात यावा व दिलेला भत्ता वसुल करण्यात यावा, अशी तक्रार १३ मार्च २०१६ रोजी वैद्यकीय विभागाकडे केली. त्यातच त्यांच्याकडुन चालविण्यात येणाय््राा खाजगी दवाखान्याची नोंदही पालिक दप्तरी नसल्याचा दावा डॉ. वसाणी यांनी केला आहे. त्यामुळे नोंद नसलेल्या दवाखान्यामार्फत रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालविला जात असल्याची बाब त्यांनी वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आणुन दिली. प्रशासनाने तक्रारींची दखल घेत वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यामार्फत फुलझेले यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने फुलझेले यांना १९ मे २०१६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. फुलझेले यांनी नोटीसीतील आरोपांचे खंडन करुन त्याचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाला दिले. त्यात त्यांनी डॉ. वसाणी यांनी केलेल्या खाजगी रुग्ण सेवेबाबत कोणतेही सविस्तर माहिती दिली नसल्याचा उल्लेख केला. मात्र सामान्य प्रशासनाने त्यांचे उत्तर अमान्य करीत उलट त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली. पालिकेने आपल्यावर एकतर्फी कारवाई चालविल्याचा आरोप करीत फुलझेले यांनी वसाणी यांच्या तक्रारींना कोणताही आधार नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी केवळ आपण मागासवर्गीय असल्याच्या भावनेनेतुनच तक्रारी करण्याचा सपाटा लावल्याचा दावा फुलझेले यांनी केला आहे. पालिकेकडुन होत असलेल्या कारवाईमुळे आपले मानसिक संतुलन बिघडले असुन वैद्यकीय क्षेत्रात बदनामी होऊ लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने सुरु केलेली चौकशी त्वरीत थांबवुन ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी करीत त्यांनी अब्रुनुकसानीपोटी तब्बल १ कोटी २० लाखांची नोटीस पालिकेला धाडली आहे. यावर प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसुन नोटीस आस्थापना विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.