ठाणे: बसमधून उतरुन पायी आलेल्या पाच जणांकडून चलनातून बाद झालेल्या एक कोटी आठ लाख ७० हजारांच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.काही व्यक्ति जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा घेऊन ‘कोरम मॉल’ समोर येणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गिरधर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस नाईक एस. व्ही. ठाणगे, एच. एन. पगारे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधव आणि ए. ए. सावंत आदींच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नितिन कंपनीजवळील या मॉलच्या परिसरात सापळा लावला. तेंव्हा एका बसमधून उतरुन अगदी सहज पायी येत असलेल्या जयंत कोकरे (२४, रा. नवी मुंबई, मुळ रा. करिवले, जि. रायगड), मनिष चाफेकर (४०, रा. ब्राम्हण अळी, भिवंडी), दिनेश शहा (५४, रा. नाहूर, मुलूंड), विजय गरुड (५३, रा. धर्मवीरनगर, ठाणे) आणि दिपक रिंगे (४२, रा. घणसोली, नवी मुंबई) या पाच संशयितांकडे चौकशी करुन त्यांच्या बॅगांची झडती घेतल्यानंतर ही रोकड मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यापैकी चाफेकर आणि रिंगे चालक आहेत. हे पाचही जण वेगवेगळया परिसरातील आहेत. त्यांच्याकडून चलनातून बाद झालेल्या ५०० च्या २८ लाख तर एक हजारांच्या ८० लाख ७० हजार अशा एक कोटी आठ लाख ७० हजारांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांनी या नोटा रायगड आणि मुलूंड भागातून आणल्या होत्या. १८ ते २० टक्के कमिशनच्या बदल्यात ते सध्या चलनात असलेल्या नोटा बदलून घेणार होते, अशी प्राथमिक माहिती असून त्या कोणाकडून आणल्या होत्या, कोणाला दिल्या जाणार होत्या? या सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात बसमधून ‘त्यांनी’ आणल्या एक कोटी आठ लाखांच्या जुन्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 9:40 PM