ठाणे : जादा व्याजाच्या आमिषाने एका मासळी विक्रेत्या महिलेसह ४७ हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या पांडुरंग खरात (३६, रा. लोकमान्यनगर, पाडा क्रमांक तीन, ठाणे) याला ठाणे न्यायालयाने तीन वर्षे तुरुंगवास आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पाच महिने सश्रम तुरुंगवासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.
आरोपी पांडुरंग खरात याने ठाण्यातील वर्तकनगर भागात विठोबाजान्या हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस ही वित्तीय संस्था स्थापन केली होती. संस्थेमार्फत नंदा बागडेकर (४८, रा. महागिरी कोळीवाडा, ठाणे) यांना त्याने जादा व्याजाचे आमिष दाखवून आपल्या संस्थेमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडले. तिच्यासह ४८ गुंतवणूकदारांची एक कोटी १२ लाख ४६ हजार २६४ रुपयांची फसवणूक त्याने केली. सुरुवातीला काही काळ त्याने काही लोकांना पैसे परतही केले. मात्र, त्यानंतर इतरांची त्याने फसवणूक केली. १४ एप्रिल २०१६ ते २३ एप्रिल २०१७ या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. दरम्यानच्या काळात गुन्हे शाखेच्या पथकाने खरात याच्या वर्तकनगर येथील कार्यालयातून १२ लाख २० हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी २० जुलै २०१७ रोजी एमपीआयडी कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल झाले होते. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांच्या न्यायालयात २६ ऑगस्टला झाली. सर्व साक्षी-पुरावे पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला एमपीआयडी-३ प्रमाणे दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम तुरुंगवास आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील विवेक कडू यांनी आराेपीला शिक्षा मिळण्यासाठी बाजू मांडली. पोलिस निरीक्षक महेश महाजन यांनी तपास अधिकारी म्हणून, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार आर. एच. निकुंभे आणि एस. एस. पाटील यांनी काम पाहिले.