टिटवाळा : आंबिवलीनजीकच्या गाळेगाव येथील धम्मदीपनगर झोपडपट्टीत राहणाºया एका नाका कामगारास प्राप्तिकर विभागाने एक कोटी पाच लाख ३८ हजार रुपयांची नोटीस बजाविली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणारे आहिरे कुटुंब पुरते हवालदिल झाले आहे.
भाऊसाहेब आहिरे (३२) हे परिसरात बिगाºयाचे काम करतात. आठवड्यातील तीन ते चार दिवस त्यांना काम मिळते. प्रतिदिन ३५० रुपये मजुरी त्यांना मिळते. तर, त्यांची पत्नी पूनम ही पापड लाटण्याचे काम करीत कुटुंबाला हातभार लावते. आहिरे यांची मोठी मुलगी जिया इयत्ता पाचवी, तर दुसरी मुलगी रिया तिसरीत शिकत आहे. तसेच चार वर्षांचा आरशू हा एक मुलगाही त्यांना आहे. आहिरे यांच्याकडे ५ सप्टेंबर २०१९ ला प्राप्तिकर विभागाने ७८ लाख कोटक महिंद्रा बँकेत आपण नोटाबंदीच्या कालावधीत जमा केले असल्याबाबत विवरण मागितले.
त्यानंतर १२ डिसेंबर २०१९ ला प्राप्तिकर विभागाने त्यांना एक कोटी पाच लाख ३८ हजार प्राप्तिकर भरण्याची नोटीस पाठवली. त्यामुळे आहिरे यांनी स्थानिक कार्यकर्ते व नगरसेवक यांच्याकडे याबाबत चर्चा केली. त्यावेळी कोटक महिंद्रा बँकेत त्यांच्या नावाने बोगस मतदानकार्ड, पॅनकार्डद्वारे जी.बी. एंटरप्रायझेस नावाने बँक खाते उघडून व्यवहार केल्याचे लक्षात आले. तसेच नोटिशीत जी.बी. एंटरप्रायझेसच्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आहिरे यांनी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना तक्रार अर्ज देत न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याकाळात अनेकांनी काळे पैसे पांढरे केल्याचे आरोप झाले. नोटाबंदीच्या काळात व्यवहार केलेली खाती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्याने त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. दरम्यान, आहिरे यांच्याप्रकरणी ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक राठोड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.