लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकरिता येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ठाण्यातून एक लाख ६० हजार जेवणाची पाकिटे बुधवारी गेली होती. ५० टक्के पाकिटे मंगळवारी आणि उर्वरित ५० टक्के पाकिटे बुधवारी मुंबईला रवाना झाली. बुधवारी ठाण्यात आनंदनगर चेकनाक्याजवळ दुपारनंतर बसच्या रांगा लागल्याचे दिसत होते. जिल्ह्यातील विविध भागांतून बस कार्यकर्त्यांनी भरून येत होत्या. याच टोलनाक्याजवळ शिंदे गटाकडून ३०च्या आसपास बस तैनात ठेवण्यात आल्या होत्या. त्या बस शाखेतून जाऊन कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाल्या. ठाकरे गटाने मासुंदा तलाव येथे दुपारी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर ३.३० नंतर लोकलने प्रवास करून शिवतीर्थ गाठल्याचे दिसून आले.
ठाणे हा शिंदे गटाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक नेण्याचे नियोजन शिंदे गटाने केले होते. ठाकरे गटानेही ठाण्यातून शिवसैनिक मुंबईत नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाने ठाण्यातील प्रत्येक शाखेतून मेळाव्याकरिता येणाऱ्या शिवसैनिकांसाठी २५० बस आणि ५५० छोटी खासगी वाहने तैनात केली होती. बीकेसी मैदानाच्या दिशेने दुपारी ३ वाजताच्या सुमारास टप्प्याटप्प्याने ती रवाना झाली. यामुळे शहरातील महामार्गांसह अंतर्गत मार्गांवर काही प्रमाणात वाहतूककोंडी झाली.
पनवेलपासून सभेच्या स्थळापर्यंत वाटप
शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ठाण्यातून एका नामांकित मिठाईवाल्याकडून एक लाख ६० हजार जेवणाची पाकिटे बीकेसीला रवाना केली. याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सोपविण्यात आली होती. मंगळवारी ५० टक्के आणि बुधवारी ५० टक्के पाकिटे रवाना झाली. काही पाकिटे पनवेल, काही ईस्टर्न एक्स्प्रेस वे, तर काही वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी बसने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना याचे वाटप केले.
काही पाकिटे थेट बीकेसीला रवाना झाली. एसटीच्या भिवंडी आणि वाडा येथून १८५ एसटी बसगाड्या बीकेसीला रवाना झाल्या. ठाणे परिवहन सेवेतील परिवहन समिती सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी नितीन कंपनी येथे शक्तिप्रदर्शन करून बसद्वारे बीकेसी गाठले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"