ठाणे : शहरातील अत्यावश्यक सेवांसाठी निधी मिळत नसतांना, त्यांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत थांबविले जात असतांना, महापौर निधीतून शहराच्या विविध भागात तब्बल १० कोटींचा चुराडा करुन कट्ट्ये बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाच्या नगरसेवकांनी केला. परंतु महापौर निधी कसा आणि कुठे वापरायचा याचा सर्वस्वी अधिकार महापौरांना असल्याचे मत शिवसेनेच्या नगरसेवकांनी मांडले. मात्र, हे कट्टे बांधून त्याचा उपयोग काय, असा सवाल करीत ठाणेकरांच्या पैशांची उधळपटटी करण्याचाच हा प्रकार असल्याचा टोलाही भाजपाच्या नगरसेवकांनी लगावला.
शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या मुद्याला हात घातला. महापौर निधी कशा प्रकारे वापरला जाणे अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परंतु महापौर महोदय आपल्या मर्जीतील नगरसेवकांसाठीच जास्तीचा निधी देत असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी सभागृहासमोर दिली. त्यामुळे नियम काय सांगतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर महापालिकेने महापौर निधी वापरण्याचे अधिकार हे महापौरांचे आहेत, तो कसा वापरायचा कोणाला द्यायचा हे अधिकार देखील त्यांचेच असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु भाजपच्या नगरसेवकांना हा मुद्दा रास्त वाटला नाही. त्यांनी थेट महापौर निधीतून केल्या जाणाऱ्या कामांवरच थेट बोट ठेवत त्यावरच आक्षेप नोंदविला.
दुसरीकडे, भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी तर महापौर निधीचा कसा चुकीच्या पध्दतीने वापर सुरु आहे, याचे उदाहरणच सभागृहासमोर आणले. महापौर निधीतून महत्वाची कामे शहरात होणे अपेक्षित असतांना शहराच्या विविध भागात १० कोटींचे कट्टे बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे कट्टे केवळ बसण्यासाठी असणार आहेत. परंतु एका कट्ट्यांसाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार असून त्याठिकाणी काय सोन्याचा मुलामा लावला जाणार आहे का? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी शिवसेना नगरसेवकांना चक्रावुन सोडल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे शहरातील इतर काही महत्वाची अत्यावश्यक कामे शिल्लक आहेत, ती कामे व्हावीत, यासाठी इतर नगरसेवक प्रयत्न करीत आहेत, परंतु कोरोनामुळे निधी नसल्याचे कारण देत या कामांसाठी निधी नसल्याचे सांगितले जात आहे. अत्यावश्यक कामांना निधी मिळत नसतांना या कट्ट्यांसाठी निधी कसा मिळतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.त्यामुळे शिवेसनेचे नगरसेवक आणखीनच संतप्त झाल्याचे दिसून आले.
महापौरांनी कोणाला निधी द्यायचा, कीती निधी द्यायचा हा अधिकार त्यांचा असल्याचे मत स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी व्यक्त केले. परंतु भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याने अखेर सभापती संजय भोईर यांनी महापौर निधीच्या खर्चाबाबतचा अधिकार हा त्यांचा असल्याने त्यावर भाष्य करणो अयोग्य असल्याचे सांगत हा विषय थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा वाद काहीसा शमला असला तरी महासभेत या विरोधात जाब विचारला जाणार असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
महापौरांच्या वॉर्डात १०० कोटींचे काममागील दोन वर्षापासून कोपरीतील कोपरी प्रसुतीगृहासाठी १० लाखांच्या निधीची मागणी केली जात आहे, त्याची फाईलही मंजुर आहे. काही दिवसांपूर्वी या प्रसुतीगृहातील एका बाजूचा स्लॅबही पडला आहे. दुसरीकडे बारा बंगला परिसरातील रस्त्याच्या कामासाठी ५ कोटींच्या निधीची फाईलही तयार आहे, निधीही मंजुर झाला आहे. परंतु त्यासाठी देखील आता निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. असे शहरात इतर ठिकाणी देखील महत्वाची अत्यावश्यक कामे असून त्यासाठी निधी दिला जात नाही. मात्र महापौरांच्या वॉर्डात कामांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर कसा झाला असा सवालही आता भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.