ठाणे: एका सहा वर्षीय मुलीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश पास्को कोळी (वय ३५) याला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचीही शिक्षा आरोपीला सुनावण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी विवेक कडू यांनी बुधवारी दिली.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन सागरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९:३० ते ११ या दरम्यान देवतलाव बाग तसेच उत्तन परिसरात आरोपीच्या घरी हा प्रकार घडला होता. पीडित सहा वर्षीय मुलगी तिच्या घराजवळील बागेमध्ये खेळण्यास गेली होती. ती ११ च्या सुमारास घरी परतली. याच दरम्यान तिला एका अनोळखीने आईस्क्रीमच्या बहाण्याने तिच्याशी गैरप्रकार केल्याची बाब तिच्या आईच्या निदर्शनास आली. कोणाला काही सांगू नये, यासाठी त्याने पुन्हा तिला आणखी एक आईस्क्रीमही दिल्याचे उघड झाले.
याप्रकरणी पीडितेच्या आईने २५ जानेवारी २०१९ रोजी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा सर्व प्रकार रितेश याने केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे विशेष पोस्को न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात २ जानेवारी रोजी झाली. विशेष सरकारी वकील विवेक कडू यांनी साक्षी पुरावे सादर करून आरोपीच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.