ठाणे : वागळे इस्टेट, इंदिरानगर भागातील एका १६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अबुसामा शब्बीर शेख (२३, रा. इंदिरानगर, ठाणे) या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.यातील पीडित मुलाला चायनीज खाण्याच्या बहाण्याने आरोपी अबुसामा याने २ डिसेंबर २०१३ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घराच्या छतावर नेले होते. तिथे त्याच्या तोंडात रुमाल टाकून त्याचे हात पकडून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी ३ डिसेंबर २०१३ रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अबुसामा याला ४ डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये ११ मार्च २०१४ रोजी तो जामिनावर सुटला होता. मात्र, त्याला पुन्हा १० मार्च २०१६ रोजी अजामीनपात्र वारंटने पोलिसांनी अटक केली होती. परंतु, १० जून २०१६ रोजी तो पुन्हा जामिनावर सुटला होता. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष पोक्सो न्यायाधीश व्ही.व्ही. वीरकर यांच्या न्यायालयात ३ मे रोजी झाली. यामध्ये सहा कामगारांची साक्ष पडताळण्यात आली. पोलिसांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारावर आरोपी अबुसामा याला न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली.
अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: May 03, 2024 9:52 PM