मनोर : पालघर तालुक्यातील नानिवली ब्रम्हपूर येथील मृत व्यक्ती व इतरांच्या नावे असलेली शंभर एकर जमीन खोट्या स्वाक्षऱ्या व डमी व्यक्ती उभ्या करुन बळकावण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तत्कालिन मंडळ अधिकारी, तहसीलदार व दुय्यम निबंधक यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागातील नानिवली ब्रम्हपूर येथील सुरेश वामन उघडे व इतर यांच्या सर्व्हे नं. ३१७ मधील सुमारे शंभर एकर जमिनीचे खोटे दस्तऐवज सादर करून व मयत खातेदाराच्या नावे डमी व्यक्ती उभी करून तिचे फोटो व सह्या करून दुय्यम निबंधक पालघर येथे बनावट नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही जमीन घेणाऱ्या डायनॅमिक प्रकल्पासाठी वसंत कोठडीया व इतर सात लोकांनी आदिवासी व कातकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या जमिनीची बनावट विक्री २०११ साली केली होती. या प्रकरणी काही आदिवासी खातेदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच मनोर पोलीस ठाण्यात मृत आदिवासीच्या नावे बोगस दस्तऐवज तयार करून जमीन बळकावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
डमीद्वारे बळकाविली १०० एकर जमीन
By admin | Published: April 27, 2017 11:42 PM