पंकज रोडेकर ठाणे : राज्यात १ जून ही शासकीय जन्मतारीख म्हणून ओळखली जाते. त्यानुसार, अनेक जण आपला खरा अथवा खोटा वाढदिवस साजरा करताना दिसतात. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील जवळपास शंभर वकिलांचीही जन्मतारीख १ जूनच आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा बार वकील असोसिएशनने या १०० जणांचा वाढदिवस करण्याचा निर्णय घेऊन २१ किलो केकची ऑर्डर दिली आहे.
अशा प्रकारे १ जून रोजी न्यायालयातील वकील बार रूममध्ये १०० वकिलांचा वाढदिवस साजरा करण्याची राज्यातील बहुधा पहिलीच वेळ असावी, असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पूर्वीच्या काळी एखाद्याला शाळेत प्रवेश घेताना जन्मतारीख लक्षात न राहिल्यामुळे अंदाजे १ जून जन्मतारीख नोंदवली जात होती. त्यामुळे १ जून ही शासकीय जन्मतारीख म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यातच १ जूनला वाढदिवस साजरा होणाऱ्यांची संख्या अधिकच दिसत आहे. यामध्ये बºयाच जणांची जन्मतारीख खोटी असते, तर काही जणांची जन्मतारीख खरी असते. त्यानुसार, ठाणे जिल्हा बार वकील असोसिएशनने १ जून रोजी जवळपास १०० वकील सदस्यांचे वाढदिवस असल्याने तो दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १४ बाय दीड फुटांच्या केकची आॅर्डर दिली आहे. जिल्हा न्यायालयातील वकील असोसिएशनच्या बार रूममध्ये दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
२१ किलोच्या केकची दिली ऑर्डर : जिल्हा असोसिएशनमध्ये एकूण चार हजार वकील सदस्य आहेत. त्यातच जवळपास १०० सदस्यांची जन्मतारीख १ जून आहे. त्यामध्ये ज्येष्ठ वकील नाना मोटे आणि यशवंत म्हस्कर यांचाही समावेश आहे. या मंडळींचा वाढदिवस करण्याचा निर्णय संघटनेने घेऊन त्यासाठी २१ किलो वजनाच्या केकची ऑर्डर दिली असून तो साधा केक असणार आहे. सध्या न्यायालयात सुट्यांचा सिझन सुरू असल्याने बरेच जण बाहेरगावी असल्याने १०० जण येतील की नाही, याची शक्यता कमी आहे.
जिल्हा न्यायालयातील १०० वकील सदस्यांचा वाढदिवस १ जून रोजी येतो. ही बाब विशेष असल्याने १ जून रोजी वाढदिवस साजरा करण्याची ही ठाण्यातील नाही, तर राज्यातील जिल्हा न्यायालयातील वकिलांची बहुधा पहिलीच वेळ आहे. तसेच वकील असोसिएशनच्या निर्णयानुसार हा दिवस साजरा केला जात असून त्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. - अॅड. प्रशांत कदम, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बार वकील असोसिएशन