ठाणे : १०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली त्यापोटी दोन टक्के कमिशनच्या रकमेतील ७३ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या राजेश सिंघवी, सिंधू राजन, पिरूमलराज, चंद्रम आणि पांडियन या पाच जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ठाण्याच्या माजिवडा येथील एका ५२ वर्षीय व्यावसायिकाची २०१५ मध्ये एका मित्रामार्फत राजेशशी ओळख झाली होती. पालघर जिल्ह्यातील वाडा आणि जालना जिल्ह्यात या व्यावसायिकाला स्टीलचे रॉड बनवण्याची कंपनी चालू करायची होती. त्यासाठी १०० कोटींची गरज होती. हे १०० कोटींचे कर्ज साडेसहा टक्के व्याजदराने बँकेतून मिळवून देतो, असे सांगून राजेशने त्याला ५० कोटींचे दोन डीडीही दाखवले. त्यांचा अशा प्रकारे विश्वास संपादन करून वचनपत्र बनवण्यासाठी आणि कमिशनसाठी दोन टक्के म्हणजे दोन कोटींची रक्कम द्यावी लागेल, असेही सांगितले. या व्यापाºयाने ते देण्याची तयारी दर्शवली.त्यातील ७३ लाख रुपये त्याने आधी दिले. उर्वरित एक कोटी २७ लाख रुपये नंतर देण्याचे ठरले. राजेश आणि त्याच्या चार साथीदारांनी हे पैसे घेतल्यानंतर या व्यापाºयाला कोणतेही कर्ज मिळवून दिले नाही. शिवाय, ७३ लाखांची रक्कमही हडप केली. १५ डिसेंबर २०१५ पासून १२ सप्टेंबर २०१८ या दोन वर्षांच्या काळात त्यांनी वारंवार तगादा लावूनही त्यांना पैसे देण्यात आले नाही. नंतर, त्यांनी फोनही न घेता पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यापाºयाने तक्रार दिली. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
१०० कोटी कर्जाचे आमिष; ७३ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:40 AM