ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील २२ हेक्टर ४८ आर जमिनीचे १०० टक्के भूसंपादन गुरुवारी पूर्ण करण्यात आले. जमिनीचा ताबा देखील नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला दिला. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण तत्काळ पाडून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा खुला ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वे नंबरमधून तोडली. बुलेट ट्रेनकरिता लागणाऱ्या जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला.
या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या भोगवटादारांकडून जमिनी घेऊन त्या बुलेट ट्रेन प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रकल्पाच्या समिती प्रमुखांसह नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, ठाणे समिती उपप्रमुख, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी यंत्रणा या गावांमध्ये तैनात करून जागा मोकळी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूखंडावर वसलेल्या रहिवाशांकडून प्रशासनाला कडाडून विरोध झाला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून यावर मात केली.