लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/डोंबिवली : इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशनने (आयसीएसई बोर्ड) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनवर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ठाणे शहराचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कन्या स्नेहा जयस्वाल हिने ९७.६ टक्के गुण मिळवले आहे. ती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी आहे. डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेतील चैतन्य बुलुसू याने कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात, तर पार्थ पाटील याने गणित व सोशल स्टडीज विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.ठाणे शहरातील लोढा वर्ल्ड स्कूल, हिरानंदानी स्कूल, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल आणि बिल्लाबाँग स्कूल या चार शाळांचे विद्यार्थी या बोर्डाच्या परीक्षेस बसले होते. लोढा वर्ल्ड स्कूलमधील १० विद्यार्थी, सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील ४८५ विद्यार्थी, बिल्लाबाँग शाळेतील ८३ विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरले होते. बिल्लाबाँग शाळेच्या केवल देढिया याने ९८.८ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. हिरानंदानी शाळेतील २४० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डोंबिवलीच्या ओंकार शाळेच्या चैतन्य बुलुसू याने कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात १०० पैकी १०० गुण मिळवताना सर्व विषयांचे मिळून एकूण ९७ टक्के गुण मिळवले आहेत. चैतन्यला कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील, हे अपेक्षित होते. त्याने इंग्रजीवरही अधिक भर दिला होता. चैतन्यचे वडील कृष्णा हे मेकॅनिकल इंजिनीअर, तर आई अनुराधा ही गृहिणी आहे. त्याचा एक लहान भाऊ सातवीच्या वर्गात शिकत आहे. चैतन्यला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे आहे. पार्थ पाटील याने गणित व सोशल स्टडीज या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवताना सर्व विषयांत ९७.४ टक्के गुण मिळवले आहेत. पार्थला गणितात जास्त गुण मिळतील, याची खात्री होती. पण, सोशल स्टडीजची नव्हती. मात्र, दोन विषयांतील शंभर नंबरी यशामुळे त्याला अत्यानंद झाला आहे. तो सुरुवातीपासून दररोज तीन तास अभ्यास करत होता. आॅगस्टपासून तो दररोज पाच तास अभ्यास करत होता. त्याचे वडील संदीप हे सिव्हील इंजिनीअर, तर आई गृहिणी आहे. पार्थला पुढे संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. राज्यात सहावा-सातवाआयसीएसई बोर्डाने घेतलेल्या इयत्ता बारावीचाही निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचे ३१४ विद्यार्थी, तर हिरानंदानी शाळेतील ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंघानिया शाळेच्या बारावीच्या आयएससी बोर्डातून जेहेब अहमद मकानी याने ९८.५ टक्के गुण तसेच, मैत्री तिवारी हिने ९७.५ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी राज्यात अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे.स्नेहाला मिळालेले यश सर्वात मोठे आहे. आम्हाला तिचा अभिमान वाटतो. - संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका
ठाण्यातील शाळांचा १०० टक्के निकाल
By admin | Published: May 30, 2017 5:56 AM