ठाणे : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून बाधित जनावरांची संख्या १०३ वर पोहोचली. आतापर्यंत चार वर पोहोचली आहे. या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पशु संवर्धन विभाग अधिक सतर्क झाला आहे. त्यानुसार बाधित जनावरे आढळून येणाऱ्या ठिकाणी पासून ते आजूबाजूच्या पाच किमी अंतरापर्यंत सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी पाठोपाठ ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली. या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या थेट १०३ वर जावून पोहोचली आहे. या वाढत्या प्रदुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.
लागण झालेल्या जनावराच्या ठिकाणापासून ते पाच किलोमीटरच्या अंतरातील इतर जनावरांचे लसीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी लसीचा साठा उपलब्ध आहे. दरम्यान, बदलापूर, शहापूर, भिवंडीतील शेलार, भिवंडी पालिका हद्दीतील बाधित क्षेत्रातील १९ हजार ६१४ जनावरांपैकी १७ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन विभागाकडून देण्यात आली.