सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी १०३ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह आधीचे तीन संचालक आणि दोन नवीन अशा सहा जणांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ते बिनविरोध विजयी झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा वसई तालुका या मतदारसंघातून अध्यक्ष पाटील बिनविरोध विजयी झाले. याशिवाय अंबरनाथचे विद्यमान संचालक राजेश पाटील, जव्हारचे दिलीप पटेकर यांच्यासह ठाण्यातील विद्यमान संचालक बाबाजी पाटील विजयी झाले आहेत. याशिवाय प्रथमच आणि बिनविरोध विजयी होणाऱ्यांमध्ये माजी आमदार अमित घोडा हे असून, ते डहाणू मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचे वडील व माजी आमदार कृष्णा घोडा या मतदारसंघातून विजयी होत असत. याप्रमाणे मोखाडा तालुक्यातून बाबुराव दिघा हे प्रथमच बिनविरोध विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून ॲड. देवीदास पाटील निवडून येत असत. पाटील यांचे निधन झाले. बिनविरोध विजयी झालेल्यांमधील पाच संचालक आमचेच असल्याचा दावा विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला.
टीडीसीसी बँकेच्या २१ जणांच्या संचालक मंडळासाठी ३० मार्च रोजी मतदान होऊन मतमोजणी ३१ मार्च रोजी पार पडणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झालेल्या २०६ उमेदवारी अर्जांची छाननी उद्या (शुक्रवार) ५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. ८ ते २२ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने किती उमेदवार माघार घेतात याकडे सहकार क्षेत्रातील धुरंधरांचे लक्ष लागले आहे.
........
वाचली.