प्रज्ञा म्हात्रे / ठाणेरिक्षातून आपल्या नातेवाईकांसोबत काठी टेकत टेकत १०७ वर्षांच्या आजीबाई विठाबाई दामोदर पाटील मतदान केंद्रात पोहोचतात. त्यांना पाहून रांगेतील मतदार त्यांच्या वयाचा अंदाज बांधतात. मतदान करुन आल्यावर जेव्हा त्यांचे वय समजते तेव्हा मतदान केंद्रात टाळ््यांचा एकच कडकडाट होतो. हा प्रसंग घडला तो प्रभाग क्रमांक २० मधील ५६ क्रमांकाच्या मतदान केंद्रात. त्या बाहेर आल्यावर त्यांचे फोटो टिपण्यास मात्र मतदारांनी गर्दी केली. शंभरी ओलांडलेल्या विठाबाई जेव्हा मतदार केंद्रात येत होत्या तेव्हा त्यांच्या उत्साहाचे सर्वच जणांनी कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांना मतदार केंद्राबाहेर आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांबरोबर मतदान केंद्रातील अधिकारी - कर्मचाऱ्यांनीही व्यवस्थित मार्गदर्शन केले. त्यांचे आभारही मानण्यास ज्येष्ठ नागरिक विसरले नाहीत. कोणाची मुले तर कोणाची मुलगी, कोणाची नातवंडे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना हाताला धरुन मतदानाला आणत असल्याची दृश्ये नजरेस पडली. प्रभाग क्रमांक २१ मध्ये मतदानासाठी आलेल्या आजीबार्इंना पाहून सर्वच मतदारांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे बाव होते. भगवती शाळेत शंभरी ओलांडलेल्या आजीबाई अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचरवर मतदानासाठी आल्या तेव्हा सर्वच जण अचंबित झाले होते. प्रभाग क्र. १९ मध्ये ७१ वर्षीय आजीबाई मतदान करताना प्रचंड गोंधळलेल्या होत्या. त्यांना चारही उमेदवाराला मत देईपर्यंत किमान साडेचार मिनिटे लागली. मतदान केंद्रातील संबंधीत कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ८२ वर्षीय सावित्री घोरपडे या आजीबार्इंना मतदान करण्यासाठी एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागल्याने मतदान केंद्राध्यक्षाने त्यांचे कौतुक केले. या आजीबार्इंना आम्ही एकदाच समजवले त्यांनी नंतर कोणतीही शंका विचारली नाही. सुशिक्षितांना सांगून सांगून थकलो पण सर्वांत कमी वेळ या आजीबाईंना लागला असल्याचे केंद्राध्यक्षांनी सांगितले. सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भास्कर कॉलनी परिसरात मतदानासाठी सर्वाधिक मतदार बाहेर पडले. यात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग अभूतपूर्व होता. मतदान करताना आमचा कोणताही गोंधळ उडाला नाही, आधीच सर्व माहिती आम्हाला मिळाली होती. कमी वेळात आम्ही मतदान केले अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक २१ मधील बी-केबीन येथे ९१ वर्षीय प्रयाग बनसोड या आजीबार्इंनी आपल्या थरथरत्या हाताने मतदान केले. मतदानासाठी सकाळी सहा वाजता उठले. मतदान करताना माझा कोणताही गोंधळ उडाला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गावदेवी येथील बुथ क्रमांक २३, २४ वर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मतदार यादीत नाव नसल्याने नाव शोधण्यासाठी त्यांना या केंद्रावरुन त्या केंद्रावर धाव घ्यावी लागली. या बुथच्या बाहेर ते तासभर बसून होते. काहींचे नातेवाईक नाव शोधण्यासाठी धावाधाव करीत होते. दरवर्षी आम्ही याच ठिकाणी मतदान करतो. परंतु, यादीत नाव नसल्याने आम्ही घरी परत चाललो आहोत. उमेदवारांकडून यंदा स्लीपही आली नाही. मतदार याद्यांमधील घोळाचा फटका ज्येष्ठांना देखील बसला. या उतारवयात कोणत्या केंद्रावर आम्ही नाव शोधणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा गोंधळ सुरू असतानाच झोनल अधिकारी पाहणीसाठी आले तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी आपली नाराजी सांगितली. इतक्यात एका वाहन चालकाने उर्मट उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकून या ज्येष्ठ नागरिकांचा राग अनावर झाला. मतदान करणे हा आमचा हक्क आहे. यादीत जर नाव नसेल तर त्यासाठी आम्ही भांडणारच अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. प्रभाग क्र. २१, मलबारवाडी येथील सुगंधा साटम एक ते दीड तास केंद्रासमोर बसून होत्या. अखेर नाव नसल्याने त्या घरी परतल्या.
काठी टेकत आल्या १०७ वर्षांच्या आजीबाई
By admin | Published: February 22, 2017 6:29 AM