- पंकज रोडेकर ठाणे : सहा महानगरपालिका आणि दोन नगरपालिकांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेचा एक लाख १५ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. ६७४ महिलांची या रुग्णवाहिकेत सुखरुप प्रसूतीही झाली आहे. तत्काळ सेवा देत देणारी ही रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी लाखमोलाची ठरू लागली आहे.अपघात घडला, तर रु ग्णाला रु ग्णालयापर्यंत कसे न्यायचे, असा प्रश्न उभा राहतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असलेली रु ग्णवाहिका सेवाही अपुरी पडत असतानाच, राज्य शासनाने लक्ष घालून आरोग्य सेवा व भारत विकास ग्रुप सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात ‘रु ग्णवाहिका १०८’ सेवा सुरु केली.महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवे अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण ४० रु ग्णवाहिका कार्यान्वित असून गरजू लोक त्याचा लाभ घेत आहेत. या रु ग्णवाहिकेद्वारे रस्ता अपघात, हाणामारी, जळीत रु ग्ण, हृदयरोगी, विषबाधा, सर्पदंश, प्रसुती रु ग्ण, वीज पडून होणारे अपघात, सर्वसामान्य आजार, आत्महत्या अशा विविध रु ग्णांना रु ग्णालयापर्यंत वेळेवर पोहोचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले जातात. त्यामुळे रु ग्णांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे.ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय व्यवस्थापक डॉ.नावेद शेख यांच्या व्यवस्थापनाखाली रु ग्णवाहिकेची तत्पर सेवा मिळत असल्याने २०१४ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान वैद्यकीय सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या एक लाख १४ हजार ८३७ वर गेल्याची माहिती ठाणे जिल्हा व्यवस्थापक डॉ. किरण केदार यांनी दिली.>विषबाधेच्या वेळी पाच गाड्या धावल्याभिवंडीतील एका आश्रमशाळेत १५ ते २० विद्यार्थ्यांना काही महिन्यांपूर्वी विषबाधा झाली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात या रुग्णवाहिकेने महत्त्वाची भूमिका बजावली. पाच रुग्णवाहिकांमुळे त्या विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळू शकल्याचे डॉ. केदार यांनी सांगितले.हृदयविकाराच्यारुग्णाचा जीव वाचलाकाही महिन्यांपासून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल दहनबहाद्दूर थापा यांना हृदयविकार झाला होता. त्यांना जेजे रुग्णालयात वेळेत दाखल केले. दहा मिनिटे उशीर झाला असता तरी काही खरे नव्हते, असे डॉक्टरांनी सांगितले, याचे स्मरण डॉ. केदार यांनी करून दिले.१२ रुग्णवाहिका अत्याधुनिकजिल्ह्यातील १०८ च्या ४० रुग्णवाहिकांपैैकी १२ अत्याधुनिक आहेत. त्या रुग्णवाहिकांबरोबर इतर सर्वच रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर, आॅक्सिजन व्यवस्था, आयव्ही, औषधी अशा तत्काळ सुविधा उपलब्ध आहेत.पाच वर्षांत या रुग्णवाहिकेतून जवळपास प्रसूतीसाठी २३ हजार ७८९ महिलांना रुग्णालयात दाखल केले. त्यामध्ये वाटेतच प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने रुग्णवाहिकेत ६७४ महिलांच्या प्रसूती झाल्या. अशा प्रकारे जन्माला आलेल्या ६७४ बालकांचे रुग्णवाहिका ही जन्मठिकाण ठरली आहे.
१०८ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी मोलाची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:50 PM