लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ८७,७४९ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १०,९४७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. नापासांमध्ये कल्याण-डोंबिवली सर्वाधिक तर मुरबाड सर्वांत मागे आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त विद्यार्थी नापास झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल मुरबाड भागाचा लागला आहे. नापास होण्यात मुरबाड सर्वांत मागे राहिला आहे. कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरामध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कल्याण ग्रामीण भागात १५४ विद्यार्थी, अंबरनाथमधून ६५२, भिवंडीमध्ये ४२०, मुरबाडमध्ये ६७, शहापूरमध्ये ३९५, ठाणे शहरात २०५९, नवी मुंबईत १६४०, भाईंदरमध्ये ६३६, कल्याण-डोंबिवलीमध्ये २७६०, उल्हासनगरमध्ये १२६४ तर भिवंडीमध्ये ९०० विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यात ४४८९६ उत्तीर्ण मुलांपैकी ६८९५ मुले, तर ४२८५३ मुलींपैकी ४०५२ मुली नापास झाल्या आहेत. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ९५४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ६९८९ विद्यार्थी नापास झाले.
नवी मुंबईचा निकाल घटलानवी मुंबई : बारावीत गेल्यावर्षीपेक्षा यंदा नवी मुंबईचा निकाल घटला. गेल्या वर्षी ९५.१६ टक्के असलेला निकाल यंदा ९०.६४ टक्क्यांवर आला. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली. ६० हून अधिक महाविद्यालयांतून १५,८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,७२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून १४,०८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ४० टक्के लागला आहे.
पालघरमध्ये मोखाडा पुढे, तर डहाणू सर्वात मागे
पालघर : बारावीत पालघर जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला. उत्तीर्णांच्या टक्केवारीत मुलींनी (९२.५९ टक्के) मुलांवर (८९.२६ टक्के) बाजी मारल्याचे दिसून आले. सर्वाधिक निकाल मोखाडा तालुक्याचा (९४.७३ टक्के), तर सर्वांत कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८५.१३ टक्के) लागला आहे. पालघर जिल्ह्यात २७,१९८ मुलांपैकी २४,२७७ उत्तीर्ण झाली असून २२,२५० मुलींपैकी २०,६०२ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.२६ टक्के असून, मुलींचे ९२.५९ टक्के आहे.
भाईंदरच्या विद्यार्थ्यांची बाजी
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आदी क्षेत्रांतील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मुरबाडमधील ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुरबाडपाठोपाठ भाईंदर शहरातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या भागाचा निकाल ९१.४९ टक्के लागला.
रायगडचा झेंडा फडकला
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के लागला आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्यात ८९.५७ टक्के मुले, तर ९४.४८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. जिल्ह्याच्या निकालात तळा तालुका अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात जिल्ह्याची अडीच टक्क्यांनी घसरण झाली आहे. परीक्षेसाठी ३१ हजार ६४८ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यापैकी ३१ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.