ठाणे : पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार देणाऱ्याला मदत केल्याच्या रागातून श्यामसुंदर कांबळे (वय ४३) याच्यासह १३ जणांच्या टोळक्याने लोखंडी सळईने साहेबराव गायकवाड (४२) यांना जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी श्यामसुंदर याच्यासह ११ जणांना अटक केली आहे.
तुर्केपाडा, घोडबंदर रोड येथील रहिवासी सुशिला वाघमारे यांच्याकडे राजाभाऊ चव्हाण याच्यासह चौघांनी चार हजारांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी सुशिला यांच्यासमवेत तक्रार दाखल करण्यासाठी साहेबराव गायकवाड गेले होते. याच गोष्टीचा राग मनात धरुन २५ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजण्याच्यासुमारास आम्रपाली गायकवाड या त्यांच्या घरात पाहुणे मंडळींसह जेवण करीत असताना श्याम कांबळे याने आपल्या साथीदारांसह त्यांच्या घरात शिरकाव केला. त्यानंतर किसन पाईकराव आणि श्याम यांनी आम्रपाली यांचे पती साहेबराव यांच्या डाव्या पायावर आणि हातावर लोखंडी सळईने जबर मारहाण केली. संदीप शेळके, अमोल पाईकराव आदी सात ते आठजणांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्याचवेळी आम्रपाली यांची मुलगी श्रद्धा आणि नणंद राधा माधळकर यांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या घरावर दगडफेक करीत घरातील सामानाचेही नुकसान केले. याबाबत गायकवाड कुटुंबियांनी २६ ऑगस्ट रोजी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने श्याम कांबळे, संदीप शेळके, किसन पाईकराव, अमोल पाईकराव, संजू चौरे, गजानन तारपे, सुभाष नरवडे आणि मोकिंदा नरवडे आदी ११ जणांना गुरुवारी रात्री अटक केली. या सर्वांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.