रेवदंडा : येथील रेवदंडा सहकारी अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक पुढील आठवड्यात होत आहे. एकूण १३ जागांसाठी निवडणूक होणार असून, पाच मतदारसंघात घरत - लांबाते सहकार पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता फक्त सर्वसाधारण मतदारसंघांत आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, वरील पॅनेलचे आठ विरुद्ध तीन अशी रंगतदार निवडणूक होणार आहे.अनेक वर्षे घरत - लांबाते सहकार पॅनेलचे या बँकेवर निर्विवाद वर्चस्व आहे. यावेळी महिला राखीव मतदारसंघात दोन, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात एक, विभुक्त भटक्या जमाती मतदारसंघात एक व इतर मागासवर्गीय मतदारसंघात एक या जागी प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने पाचही जागा बिनविरोध झाल्या आहेत.सर्वसाधारण मतदारसंघात आठ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने निवडणूक होत असून, तीन उमेदवारांनी अर्ज भरल्याने सहकार पॅनेलच्या आठ उमेदवारांना वाड्यावस्त्यांवर मतदारराजाच्या प्रत्यक्ष भेटीसाठी जावे लागत आहे. दरम्यान, सध्या ग्रामीण भागात भात कापणीची कामे वेगाने सुरू असल्याने मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)
सहकारी बँकेच्या निवडणुकीत आठ जागांसाठी ११ उमेदवार
By admin | Published: October 31, 2015 10:55 PM