भिवंडी:- कपडा तयार करण्यासाठी लागणारे यार्न खरेदी करून यार्न व्यापाऱ्याची ११ कोटी १२ लाख १३ हजार ४५९ रुपयांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत घडली असून याप्रकरणी १५ कंपनी मालकांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील विलेपार्ले येथील यार्न व्यावसायिक दीनदयाळ गौरीशंकर मुंदडा वय ५१ वर्ष असे फसवणूक झालेल्या या मालकाचे नाव असून त्यांच्याकडून सावरिया टेक्स्टाईलचे मालक सुनील अग्रवाल, डी आर टेक्स्टाईल मिलचे मालक दर्जेस देवराम चौधरी, बिरेन फाईन फॅब्रिक लिमिटेडचे मालक वीरेंद्र प्रताप सिंग, साई सहारा टेक्स्टाईलचे मालक अजय कुमार वीरेंद्र प्रताप, श्री आंबे टेक्स्टाईलचे मालक अजय कुमार बिरेंद्र प्रताप, गणेश टेक्स्टाईलचे मालक मनोज कुमार वीरेंद्र प्रताप सिंग, सिटीजन टेक्स्टाईलचे मालक लतीफ हमीद ,मेट्रो टेक्स्टाईलचे मालक अब्दुल कयूम हमीद, शमीन टेक्स्टाईलचे शमीम उर्फ पप्पू,किम्पो टेक्सटाईलचे जैनुद्दीन भाई, फुर्षण टेक्स्टाईलचे मुक्कीम भाई, अक्सा टेक्स्टाईलचे आफताब भाई,रोहित अँड सन्सचे रोहित भाई, श्री अरिहंत टेक्स्टाईलचे केवल अश्विन शहा या पंधरा जणांनी आपसात संगणमत करून २०१५ ते २०२१ या सहा ते सात वर्षांच्या काळात दिनदयाळ मुंदडा यांच्या श्री हरी यार्न सोल्युशन कंपनीच्या पूर्णा येथील गोदामातून ११ कोटी १२ लाख १३ हजार ४५९ रुपये किमतीचे यार्न खरेदी केले.
मात्र माल खरेदी केल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केले.या पंधरा जणांकडून पैशांची मागणी दीनदयाळ यांनी केल्याने त्यांना पैसे न देता शिवीगाळ व दमदाटी केल्याने आपली फसवणूक झाल्याचे दीनदयाळ यांच्या लक्षात आल्यानंतर दीनदयाळ यांनी नारपोली पोलीस ठाण्यात १५ कंपनी मालकांविरोधात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.