ठाणे : शहरात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने बुधवारपर्यंत पाच लाख सात हजार ५४३ महिलांसह पाच लाख ९५ हजार ८११ पुरुष व ४१४ तृतीयपंथी असा एकूण ११ लाख तीन हजार ३५४ उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण पार केला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.
ठाणे शहरात आतापर्यंत २४ हजार ११७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर १५ हजार ८२७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी २७ हजार ४०७ लाभार्थींना पहिला, तर १४ हजार ५२ लाभार्थींना दुसरा डोस दिला असून, ४५ ते ६० वयोगटांतर्गत एक लाख ९१ हजार ७८७ लाभार्थींना पहिला, तर एक लाख २५ हजार ५२९ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये एक लाख ४१ हजार २११ लाभार्थींना पहिला व ८५ हजार सात लाभार्थींना दुसरा तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये तीन लाख ९८ हजार २८४ लाभार्थींना पहिला आणि ८० हजार १३३ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील ४५९ गर्भवती महिलांसह ८३ स्तनदा माता व ४१४ तृतीयपंथीयांचे आणि अंथरूणाला खिळून पडलेल्या २९ व्यक्तींचेदेखील लसीकरण पूर्ण झाले आहे.