कुमार बडदे/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी शीळफाटा येथील भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेतलेले भारतीय लष्कराच्या दारूगोळ्यातील ११ जिवंत बॉम्ब बुधवारी ठाकूरपाडा परिसरातील दहिसर मोरी येथील निर्जन ठिकाणी नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने वापरलेले, परंतु त्यानंतरही त्याच्यातील दारूगोळा शिल्लक असल्याने वापर शक्य असलेले तब्बल ५९ जिवंत बॉम्ब ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट क्र मांक १ ने २८ आॅक्टोबर २०१५ रोजी शीळफाटा परिसरातील एका भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेतले होते. तेव्हापासून सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या बॉम्बपैकी ११ बॉम्ब ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट क्रमांक १मधील पोलीस अधिकारी, शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच बॉम्ब नष्ट करणारे पथक, एनएसजीचे पाच कमांडो यांनी संयुक्त कारवाई करून बुधवारी नष्ट केले. उर्वरित ४८ बॉम्ब गुरुवारी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती युनिट-१चे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी ‘लोकमत’ला दिली. बॉम्ब नष्ट करताना अनुचित घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक तसेच मुंब्रा अग्निशमन दलातील जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.
११ जिवंत बॉम्ब नष्ट
By admin | Published: June 01, 2017 3:34 AM