अंबरनाथ: येथील शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये रविवारी प्रेक्षकांची गर्दी प्रचंड वाढल्याने या चेंगराचेंगरी होऊन मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात 11 जण किरकोळ जखमी झाले.
अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल १६ मार्चपासून सुरू झाला असून आज रविवार असल्याने गायक शंकर महादेवन यांचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी हजाराच्या संख्येने प्रेक्षक कार्यक्रमस्थळी आले होते. शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची क्रेझ वाढल्याने यंदा अपेक्षा पेक्षा तिप्पट गर्दी झाल्याने अर्थात कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रण करताना पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागत होती. प्रत्येक जण कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. त्यातील नऊ जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. तर दोन रुग्णांमध्ये एका महिलेच्या नाकातून रक्त येत असल्याने तिची वैद्यकीय तपासणी करून आणि सिटीस्कॅनचे रिपोर्ट आल्यानंतर त्या महिलेला देखील उपचार करून घरी सोडण्यात आले.
या चेंगराचेंगरीत एका अकरा वर्षीय मुलाचा देखील पाय फ्रॅक्चर झाल्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र त्याचे एक्स-रे काढल्यानंतर तो मुलगा सुखरूप असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला देखील उपचार करून सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या परिसरात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.