जितेंद्र कालेकर
ठाणे : दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आफ्रिन खान (२०) या तरुणीला डायघर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने धक्कादायक माहिती दिली. आणखी दहा ते ११ मुलांना सहारा कॉलनीजवळील डोंगरात पुरल्याचे तिने सांगितल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले. मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या भागात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन पोलिसांनी पाहणी केली. प्रत्यक्षात काहीही निष्पन्न न झाल्याने आफ्रिन दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान खान या दहा महिन्यांच्या मुलाचे ३ फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. त्यापाठोपाठ भास्करनगर, कळवा येथूनही खुशी गुप्ता या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले. तिचाही शोध लागलेला नाही. आफ्रिनला दोन वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक केल्यानंतर तिच्याकडे इतर मुलांची चौकशी पोलिसांनी केली. त्यावेळी तिने वेगवेगळी असंबंध माहिती दिली. दहा ते ११ मुलांना पुरल्याची माहितीही तिने अशाच प्रकारे बडबडताना दिली. ही माहिती धक्कादायक होती. त्यातून दोन ते तीन प्रकरणांचा शोध लागेल, या आशेने अधिकाऱ्यांनी सहारा कॉलनी, शीळ फाटा याठिकाणी खोदकाम केले. पण, काहीच हाती न लागल्यामुळे पोलिसांनी आफ्रिनकडे विचारणा केली. तेव्हा पोलीस मारतील, या भीतीने अशी बतावणी केल्याचा तिने दावा केला. अर्थात, बेपत्ता मुले अद्यापही मिळाली नसल्याने आफ्रिनची चौकशी सुरुच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.