प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाण्यातील वय वर्ष १० ते १५ वर्षे वयोगटातील ११ जलतरणपट्टूंनी अरबी समुद्रातील अलिबाग येथील धरमतरजेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे सागरी अंतर ९ तास २९ मिनिटांत यशस्वीरित्या पोहून पार केले. हे ध्येय गाठण्यासाठी पहाटे १ः१५ मिनिटांनी त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिल्यावर प्रत्येकी एक तास पोहून आपल्या सहकाऱ्याला टाळी देत दुपारी ११:०७ वा. गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना स्पर्श करून आपली मोहीम फत्ते केली.
कडाक्याच्या थंडीत व उसळत्या लाटांमध्ये २७ जानेवारी २०२४ रोजी पहाटे १ः१५ वाजता अलिबाग येथील धरमतर जेट्टी येथून पहिल्या स्पर्धकाने सुरुवात केली. हे सर्व स्पर्धक कै. श्री रामचंद्र ठाकूर जलतरण तलाव येथे, सर्व परिचित प्रशिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
अभिर संदेश सालसकर - ११ वर्ष (रेड क्लिप स्कूल ठाणे ), वंशिका अय्यर- १२ वर्ष, (न्यू होरायझन इंटरनॅशनल स्कूल, रोडाज ), स्वराज स्नेहा गौरव फडनीस - १० वर्ष, ( सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, ठाणे), अमृता उल्हास शिरसागर - १२ वर्ष, (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), कणाद कुलकर्णी - १४ वर्ष, (सी पी गोएंका स्कूल), शार्दुल संदीप सोनटक्के - १२ वर्ष,( न्यू होरायझन स्कॉलर स्कूल ), रुद्रा शेखर शिराळी - १३ वर्ष, (सरस्वती विद्यालय हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स), रोहन रणधीर राणे - १३ वर्ष, (न्यू होरायझन स्कॉलर स्कूल आनंदनगर ठाणे, ), आद्या अशिष म्हात्रे - १० वर्ष, (सरस्वती एजुकेशन सोसायटीज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी ठाणे, ), सावीओला रोनाल्ड मास्करेहंस - १६ वर्ष, ( सेंट जॉन द बॅप्टीस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ) , करण शिवकुमार नाईक - १८ वर्ष, (श्री माँ विद्यालय पातलीपाडा ठाणे, ) या सर्व स्पर्धकांनी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी ३६ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे रिले पद्धतीने पोहुन पार केले.