ठाणे : महावितरणच्या डीपीजवळील उघड्या केबलमधून संचार झालेली वीज लोखंडी शिडीत उतरल्याने ११ वर्षीय आलोक याचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटीलवाडी, सावरकर नगर परिसरात शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.
या ठिकाणी असलेल्या एक मजली घराची शिडी ही महावितरणच्या डीपीजवळ आहे. अनेक खुल्या केबल्स विद्युत डीपीजवळ होत्या. त्यामधील एका केबलमधील वीज प्रवाहामुळे घराची शिडी विद्युतभारित झाली होती. आलोक या मुलाने शिडीला हात लावल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. अन्य एका महिलेलाही विजेचा झटका लागला. मात्र तिने त्वरित शिडी सोडून दिल्याने ती बचावली.
या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.