लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन ते अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कळवा खाडीपुलावरील तिसऱ्या पुलाचे महत्त्वाचे काम गुरुवारी केले जाणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ११०० मेट्रिक टन वजनाचा सांगाडा (स्पॅन) जमिनीपासून १४ मीटर उंचीपर्यंत उचलण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता हा सांगाडा बसविला जाणार आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. जुलै किंवा ऑगस्टपासून या पुलावरून वाहतूक सुरू होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत चर्चा केल्यानंतर महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे. कळवा पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे, दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या तिजोरीतून कंत्राटदाराला तब्बल १३२ कोटी रुपये दिले गेले होते. डिसेंबर २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम रेंगाळले होते. या पुलाचे काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकार व महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता.दरम्यान, कळवा पुलाचा १०० मीटर लांब व १७.५ मीटर रुंदीचा ११०० मेट्रिक टन वजनाचा सांगाडा गुरुवारी १४ मीटरपर्यंत उचलून पुलाच्या पिलरवर ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यानंतर, या सांगाड्यात काँक्रिट टाकून पूल तयार केला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्याचे काम सात दिवसांनंतरया पुलासाठी १८१ कोटी १९ लाखांचा खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत कंत्राटदाराला १३२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हा स्पॅन १०८ मीटर जमिनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारण्यात आलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा सात दिवसांनंतर सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
७७ टक्के काम पूर्ण झाल्याचा महानगरपालिकेचा दावाकळवा खाडीवरील पुलाची लांबी ३०० मीटर असून त्यापैकी १०० मीटर मुख्य लांबीचा हॅण्डल आकाराचा स्पॅन बांधण्यात येणार आहे. या पुलावर क्रिक रस्ता व कोर्ट नाक्यावरील वाहने चढण्याकरिता सरळ मार्ग राहणार आहे. तसेच साकेतकडून येणाऱ्या वाहनांकरिता वर्तुळाकार रॅम्प बांधण्यात येणार आहे.
ठाणे-बेलापूर जाण्यासाठी थेट मार्ग करण्यात येणार आहे. विद्युतीकरण, खाडी पुलाकडील दोन्ही जंक्शन व साकेत राबोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंक्शनमध्ये सुधारणा आदी बाबींचा यात समावेश आहे. त्यानुसार, २.४० किमीचे बांधकाम होणार आहे. आतापर्यंत ७७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.