- नितीन पंडितभिवंडी - महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षीच्या सानुग्रह अनुदानापेक्षा यावर्षी ९०० रुपयांनी वाढ केली आहे .मागील वर्षी लोकप्रतिनिधी यांच्या सोबत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चे अंती १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले होते.यंदा पालिका कर्मचारी संघटनांकडून १५ हजार रुपयांची मागणी केली जात होती.
यासंदर्भात मनपा आयुक्तांनी मंगळवारी कर्मचारी संघटना प्रतिनिधी व अधिकारी यांच्या सोबत बैठक बोलावली होती.या बैठकीत ११ हजार रुपये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे दिवाळी पूर्वीच वेळेत सानुग्रह अनुदान प्रशासनाने जाहीर केल्याने कामगार कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीस महानगरपालिका उपायुक्त दीपक पुजारी, लेखाधिकारी किरण तायडे, आस्थापना विभाग प्रमुख राजेश गोसावी तसेच लेबर फ्रेंड युनियनचे अध्यक्ष एड. किरण चन्ने, सरचिटणीस संतोष चव्हाण, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, भारतीय कामगार कल्याण महासंघाचे अध्यक्ष भानुदास भसाळे ,अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे महेंद्र कुंभार, भारतीय कामगार सेना भिवंडी युनिटचे सहचिटणीस रोहिदास गायकवाड, भिवंडी मुनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी, मनसे कामगार सेनेचे भिवंडी अध्यक्ष संतोष साळवी, महाराष्ट्र भिवंडी युनिटचे अध्यक्ष दीपक सखाराम राव आदी कामगार युनियनचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.