नारायण जाधव / ठाणेसीएसटी ते कल्याण मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गातील मैलाचा दगड ठरणाऱ्या खारीगांव रेती बंदर क्रॉसिंगवरील कळवा-मुंब्रा येथे उड्डाणपूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सुरू केली आहे. या उड्डाणपुलावर ११३ कोटी ९२ लाख ४४ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहेत. हा पूल पूर्ण झाल्यावर कल्याण-सीएसटी मार्गावरील सध्याची तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरील जलद गाड्यांची (एक्सप्रेस) वाहतूक पूर्णत: पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. याशिवाय कल्याणहून नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याचा वळसाही कमी होणार आहे. कल्याण-कसारा- अंबरनाथ-बदलापूर-कर्जत भागातील भागातून उन्नत मार्गाने थेट ऐरोली मार्गे नवी मुंबई गाठणे सोपे होणार आहे. याशिवाय येत्या तीन वर्षांत प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानक बांधण्याचा मानसही महामंडळाने व्यक्त केला आहे. दिघा रेल्वे स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळ पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रूपये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकातील अंतर ५.७६ किमी आहे. सध्याच्या ऐरोली नॉलेज पार्कसमोर दिघा स्थानक उभे करण्यात येणार आहे. नॉलेज पार्कमधील पटनी कॉम्पुटर्ससह इतर आयटी कंपन्या आणि कळवा ईस्ट, विटावा, दिघा परिसर आणि तेथील एमआयडीसीतील उद्योगांनातील कामगारांना हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. सध्या ठाण्याहून ऐरोली गाठण्यासाठी आठ मिनटे लागतात. ठाणे-वाशी-पनवेल मार्गावरील बहुतेक स्थानके प्रत्येकी तीन ते चार मिनटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे ठाण्याहून दिघा स्थानकही तीन ते चार मिनिटांच्या अंतरावर असणार आहे.माजी खासदार संजीव नाईक यांनी दिघासह पावणे स्थानक व्हावे यासाठी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता.
कल्याण-नवी मुंबई मार्गावर पारसिक रेतीबंदर येथे ११३ कोटींचा उड्डाणपूल
By admin | Published: April 29, 2017 1:40 AM