ठाणे : आदिवासी विकास महामंडळांतर्गत केलेल्या धान्यखरेदीत घाेटाळा झाला असून शहापूर, मुरबाड, कर्जतमध्ये साडेअकरा कोटींची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घाेटाळ्याप्रकरणी १४ जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून शहापूरच्या घाेटाळ्यात आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश यांचा समावेश असल्याचे तपासात पुढे आले आहे.
या प्रकरणात यापूर्वीच तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शहापूरच्या वेहळोली केंद्रात ६,४६६.४२ क्विंटल धान्य आणि बारदाना यांचा दोन कोटी ७३ लाखांचा गैरव्यवहारा झाला. किन्हवली पोलिस ठाण्यात अविनाश राठोड आणि विजय गांगुर्डे या माजी अधिकाऱ्यांसह विपणन निरीक्षक महेश येवले आणि केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
मुरबाड तालुक्यातील न्याहाडी केंद्रात १९,९९१ क्विंटल धान्य आणि ४९,९७९ बारदाना असा सहा कोटी २८ लाख ११,१८० रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, टोकावडे पोलिस ठाण्यात अविनाश राठोड, विजय गांगुर्डे या माजी अधिकाऱ्यांसह गोविंद भला, रमेश घावट, नानू वाघ, अजय घस्ते यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
मोठ्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता
कर्जत पोलिस ठाण्यातही ८६ लाख ५,०६७ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात विजय गांगुर्डे आणि अविनाश राठोड यांच्यासह किसन वारघडे आणि प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा आणखी तपास सुरू असून यात काही मोठ्या व्यक्तींचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.