ठाणे : देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून रस्त्यांसह, उद्याने, तलाव, पार्र्किं ग, वृक्ष, सीसीटीव्ही आदींव्दारे शहर सुशोभीकरणासह सर्व सोयीसुविधा युक्त करण्यासाठी १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाल्याचा अहवाल आहे. परंतु या नवीन वर्षातील आगामी सहा महिन्यात म्हणजे जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करणार, असा संकल्प ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ संदीप माळवी यांनी लोकमतला सांगितले.
स्मार्ट सिटी मिशन हे केंद्र शासनाची योजना आहे. याव्दारे पंतप्रधानांनी जून २०१५ रोजी भारतातील एकूण १०० शहरांना स्मार्ट सिटीचा दर्जा दिला आहे. त्यात राज्यातील १० शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. ठाणे महापालिकने ठाणे स्मार्ट सिटी लि. या कंपनीची स्थापना करून त्याव्दारे विविध स्वरूपाचे १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमध्ये शहराच्या विकासात्मक कामांचा समावेश आहे. क्षेत्रधारीत विकास, पॅन सिटी सोल्युशन, ठाणे रेल्वे स्थानक परिसर,नौपाडा, पांचपाखाडी, खारकर आळी उथळसर आदी भागांमधील रस्ते, सोयी सुविधाचा समावेश आहे. याशिवाय त्यामध्ये मुख्यत्वे सॅटीस ठाणे (पू). वॉटरफ्रंट, मॅटल हॉस्पिटल नजीक नवीन रेल्वे स्टेशन, पायाभूत सुविधा, सौरऊर्जा छतांचा अंतर्भाव आहे. तर पॅन सिटी सोल्युशन मध्ये वायफाय, स्मार्ट मिटरींग, डिजी ठाणे, सीसीटीव्ही या प्रकल्पांच्या कामांचा समावेश या स्माट सिटीत केलेला आहे. यासाठी अंदाज एक हाजर १९१ कोटींचा खर्च निश्चित केला आहे.
या हजार कोटींच्या खर्चातून आतापर्यंत अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यावर ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झालेला आहे. मात्र अजूनही तब्बल छोटेमोठे १४ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण या कामाला आधीच उशिर झालेला आहे. त्यामुळे नवीन वर्षातील जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस माळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाणेकरांना या नवीन वर्षात स्मार्ट सिटीच्या या सर्व प्रकल्पांच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी फक्त जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तत्पुर्वी बहुतांशी प्रकल्पही पूर्णत्वास आली आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत जरी या पाच कामांचा उल्लेख झालेला असला तरी सर्व प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी फक्त जूनपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे सुतोवाच मोळवी यांनी केले आहे.
या प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या एक हजार १९१ कोटींच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान आणि स्वत: ठाणे महापालिकेने तजविज केली आहे. यामध्ये केंद्राकडून ५०० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा आहे. त्यातून आतापर्यंत ३४३ कोटी प्राप्त झाले. तर राज्य शासनाकडून २५० कोटींची अपेक्षा असून त्यापैकी १७१ कोटी प्राप्त झाले आहेत. तर महापालिकेने स्वत: २०० कोटींची तजवीज आदी मिळून ७१४ कोटीं प्राप्त अनुदान आहे. यातून तब्बल ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झाल्याचे आढळून आले आहेत. हाती घेतलेल्या प्रकल्पातून बहुतांशी प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरट्यवर आहे. फक्त सॅटीसह नवीन रेल्वे स्टेशन हे दोन प्रकल्प रखडणार असल्याचे प्रतिपादन माळवी यांनी केले आहे.