मीरारोड - भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाग्रस्त व संशयितांना पिण्याच्या गरम पाण्याची आवश्यकता पाहता भाईंदरच्या व्यंकटेश पार्क येथील जैन संघाच्या वतीने स्वयंचलीत पाण्याची १२ यंत्रे दिली आहेत. शिवाय पंतप्रधान निधीत २ लाखांचा धनादेश दिला आहे.मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्ण व कोरोनाच्या संशयितांसाठी महापालिकेने भाईंदरचे जोशी रुग्णालय फक्त कोरोना उपचाराकरिता राखीव केले आहे. सदर रुग्णालयात कोरोना बाधित तसेच कोरोनाचे संशयित असे सुमारे ५० जणं उपचारासाठी दाखल आहेत. या लोकांना गरम पाणी पिणे आवश्यक असून डॉक्टरसुद्धा गरम पाणी पिण्यास सांगतात. परंतु रुग्णालयात गरम पाण्यासाठी तरतूद नसल्याने आमदार गीता जैन यांनी कोरोना विरोधातील लढ्यात आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन शहरातील जैन संघांना केले होते.त्या आवाहनास प्रतिसाद देत भाईंदरच्या व्यंकटेश पार्क मधील श्री शंखेश्वर शणगार जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ तपागच्छ जैन संघ रथाकार जिनालय ने पालिकेच्या जोशी रुग्णालयासाठी नामवंत कंपनीची स्वयंचलित गरम, ठंड व साधे पाणी येणारी १२ यंत्रे देणगी स्वरुपात दिली आहेत. या वॉटर डिस्पेंसरमुळे आता जोशी रुग्णालयातील कोरोना रुग्ण व संशयितांना पिण्यासाठी गरम व शुध्द पाणी उपलब्ध झाले आहे. कोरोनाचा आजार बरा होण्यात व वाढ रोखण्यात गरम पाण्याची भूमिका सुद्धा उपयोगी असल्याने जैन मंदिर संघाच्या वतीने ही यंत्रे देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे संघाच्या वतीने विक्रम मुठलिया यांनी सांगितले.सदर यंत्रे महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या कडे सुपुर्द करण्यात आली. या शिवाय जैन संघाने २ लाखांचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आयुक्तां कडे दिला आहे. यावेळी आमदार गीता जैन सह जैन मंदिरा संघाचे जसवंत जैन, श्रेणिक शाह, विक्रम मुठलिया, संदिप जैन आदी प्रमुख उपस्थित होते. आ. गीता जैन यांनी शहरातील विविध धर्मियांची धर्मस्थाने, संस्था, विकासक, व्यापारी आदिंना सुध्दा मदतीसाठी येण्याचे आवाहन केले आहे.
भाईंदरच्या जैन संघाने दिली कोरोना रुग्णालयासाठी १२ स्वयंचलित गरम पाणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 7:31 PM