उल्हासनगर : गुरवारी होणाऱ्या महापालिका अंदाजपत्रक महासभेत मालमत्ता करात १२ व ७ टक्के सवलत देण्याचे संकेत भाजपा नगरसेवकांनी दिले. तसेच लॉकडाऊन काळात ३ महिन्या पेक्षा जास्त दुकानें बंद असल्याने त्यांचे ३ महिन्याचे पाणी बील माफीची शक्यता स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी व्यक्त केली.
गरसेउल्हासनगर महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रका बाबत गुरवारी महासभा होणार असून त्यापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष व पक्षाचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, नवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींनी बैठक घेवून कोरोना महामारीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करात ३१ डिसेंबरपर्यंत १२ तर १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान ७ टक्के सूट देण्याचा ठराव मांडण्याचे संकेत स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी दिले. वार्षिक अंदाजपत्रक बैठक गुरवारी होणार आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मालमत्ता कर व दुकानदाराच्या पाणी बिलात सूट देण्याचे संकेत देवून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइ पक्ष यांच्यावर कुरघोडी केली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रक महासभेत बजेट व्यतिरिक्त अतिक्रमण झालेला महापालिका शाळेचा भूखंड, अंब्रोसिया हॉटेल जवळील आरक्षित भूखंड, याव्यतिरिक्त इतर भूखंड व शौचालयावरील अतिक्रमण आदी विषयावर चर्चा होणार आहे. तसेच कोरोना रुग्णासाठी किड्याची खिचडी, एक्सपायरी झालेले बिस्कीट व कोरोना रुग्णाच्या फ्रूटस मध्ये आढळलेले किडे याबाबतची वादळी चर्चा होण्याचे संकेत आहेत. सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप नगरसेवकांनी बैठक घेतली असून डंपिंग ग्राउंड साठी मिळालेल्या जागेचे श्रेय घेण्यासाठीही भाजप पुढे सरसावली आहे.