लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एप्रिल ते जूनच्या कालावधीत विनातिकीट २ कोटी १४ लाख प्रवाशांकडून १२ कोटी १२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोविड नियमानुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतील यासाठी नियमित तिकीट तपासणी मोहीम सुरू केली.
जूनमध्ये विनातिकीट ६३ हजार ५१० प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २.६२ कोटी दंड वसूल केला. यामध्ये उपनगरी भागातील ४० हजार ५२५ प्रकरणांचा समावेश असून त्यांच्याकडून १.२७ कोटी रुपये आणि लांब पल्ल्यांच्या विभागात २२ हजार ९८५ प्रकरणांचा समावेश होता. त्यातून १.३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
टीसींच्या विशेष पथकाने १७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत मास्क न घातलेल्या १ हजार ५३३ प्रवाशांकडून ३ लाख २ हजार इतका दंड वसूल केला. आपती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांची ३२०८ प्रकरणे आढळून आली. २८ एप्रिल ते ३० जून या कालावधीत १६ लाख ४ हजार रुपये इतका रक्कम दंड वसूल करण्यात आला.