ठाणे : नुकत्याच आलेल्या तौत्के चक्रीवादळात ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब पडणे, घरांची पडझड होणे आदी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर, दोघे जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी मृत्यू झालेल्या तिघांच्या वारसांना १२ लाखांची मदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
तौत्के चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यालादेखील त्याची झळ पोहोचली. या चक्रीवादळाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १६ मेच्या रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या कालावधीत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे, घरांची पडझड होणे आदी घटना घडल्या. या घटनांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या तालुक्यातील प्रत्येकी एक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना शासनाकडून नैसर्गिक आपत्तीत प्रत्येकी चार लाख या प्रमाणे १२ लाखांची मदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर, या वादळाच्या काळात जखमी झालेल्या दोन जखमींना देण्यात येणाऱ्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून अद्याप त्यांच्या मदतीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आलेली नाही. त्यामुळे जखमींना मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.