भिवंडी - भिवंडी ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना वाढत असताना, एका चोरीसह घरफोडीचे दोन गुन्हे नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दापोडा येथील गोदामातील तब्बल १२ लाख रुपये किमतीच्या अल्युमिनियम चोरी प्रकरणी गोदामातील दोन कामगारांविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील वसंत मिश्रीलाल भन्साली यांचे ग्लोबल कंपाऊंड दापोडे येथे भन्साली एल्युमिनियम नावाचे गोदाम असून त्याठिकाणी निखील चंद्रकांत शेलार रा.भिवंडी व दिनेश गोविंद नारायणे रा.कुर्ला,मुंबई असे दोघे व्यवस्थापक म्हणून काम करीत होते.या दोघा कामगारांनी आपापसात संगनमत करून जुन ते ऑगष्ट २०२२ या कालावधीत २८० रुपये प्रतिकिलो किंमत असलेल्या १२ लाख रुपये किमतीचा साडेतीन टन एल्युमिनियम सेक्शन अशा मालाचा अपहार केला .या प्रकरणी वसंत भन्साली यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिसांनी व्यवस्थापक निखील शेलार व दिनेश नारायणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत मानकोली येथील इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलात सिंन्यूरिटी प्रा.ली या कंपनीच्या गोदामात गणेशोत्सव विसर्जनात पोलीस व्यस्त असताना त्या रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील बाजूस असलेले शटर उघडून गोदामात प्रवेश करून गोदामातील ६८ हजार रुपये किमतीचे वेगवेगळया कंपन्याचे इलेक्ट्रीक वस्तु, वॉकर्स, रेडीमेड कपडे, खाद्य पदार्थ, डायपर व इतर मल्टी प्रोडक्ट वस्तू असा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी हैदरअली अब्दुल हमीद शेख यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिसांनी अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.