ठाणे : एक-दोन नव्हे तर तब्बल १२ विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षामध्ये कोंबून ‘टाइट’ झालेल्या एका रिक्षाचालकाची नशा वाहतूक पोलिसांनी गुरुवारी उतरवली. वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करून पोलिसांनी त्याची रिक्षाही जप्त केली.मानपाड्यातील टिष्ट्वन्स इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन एक आॅटोरिक्षा गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घोडबंदर रोडने सुसाट वेगात जात होती. सिग्नल पडल्यानंतरही रिक्षा थांबत नसल्याचे पाहून वाहतूक पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने पोलिसांनाही जुमानले नाही. अखेर, वाहतूक पोलिसांच्या कासारवडवली शाखेतील मंदार मोरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी ओवळानाक्याजवळ ती अडवली. पोलिसांनी चालकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर, एकेक करत तब्बल १२ विद्यार्थी रिक्षातून उतरले. ते पाहून वाहतूक पोलीसही आवाक झाले. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी रिक्षाचालक सतीश प्रभाकर पावसकर याला विचारपूस केली असता त्याच्या तोंडाचा उग्र वास आला. पोलिसांनी तपासणी केली असता तो मोठ्या प्रमाणात दारू प्यायलेला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याची रिक्षा जप्त करून कारवाई केली.विद्यार्थ्यांसाठीपर्यायी वाहनरिक्षातील बहुतांश विद्यार्थी इयत्ता तिसरी-चौथीचे असून ते भवानीनगर परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी रिक्षा जप्त करून चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील केली. मात्र, कारवाई केल्यानंतर मद्यधुंद चालकाच्या भरवशावर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे धोकादायक होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दुसºया वाहनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना शाळेत रवाना केले.दररोजचाच होता प्रवास : रिक्षाने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी दररोज याच रिक्षाने शाळेत जात असल्याची माहिती दिली. दररोज रिक्षामध्ये एवढे विद्यार्थी असतात आणि आईवडिलांना ते माहीत आहे, असेही त्यांनी भाबडेपणाने सांगितले.एका फेरीत जास्तीतजास्त विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचवणे रिक्षाचालकांसाठी फायद्याचे असते. त्यामुळे रिक्षात जास्तीतजास्त विद्यार्थी कोंबण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.मात्र, आपली चिमुकली मुले अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करत असल्याचे माहीत असतानाही पालक त्याकडे डोळेझाक करतात, हे निश्चितच गंभीर आहे. पोलिसांनी रिक्षाचालकाबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती दिली. मुलांच्या सुरक्षेसाठी अशा रिक्षांमध्ये प्रवास न करण्याच्या सूचनाही पोलिसांनी पालकांना दिल्या.