ठाणे : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचा सानुग्रह अनुदानाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. त्यानुसार, आता त्यांच्यासह शिक्षण मंडळ आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांनाही १२ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. विशेष म्हणजे प्रथमच कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता कर्मचाऱ्यांना ते मिळणार आहे. परंतु, आधीच डबघाईला आलेल्या पालिकेवर यामुळे १६ कोटी ४३ लाखांचा बोजा पडणार आहे.दिवाळीच्या आधीच याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून जकात आणि एलबीटी बंद झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शिवाय, आॅगस्ट महिन्यातच कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील थकबाकी म्हणून ५० कोटी अदा केले होते. त्यामुळे सुरुवातीला पाच हजार दिले जातील, असे आयुक्तांनी सांगितले होते. परंतु, त्यांच्याबरोबर झालेल्या सामंजस्याच्या चर्चेअंती त्यांनी मागील वर्षीप्रमाणेच १२ हजार ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळेच प्रथमच अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना देणी मिळणार आहेत.दरम्यान, ते देताना आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना उत्पन्न वाढीवर भर द्यावा, असे आवाहन केले आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांनीदेखील आयुक्तांच्या आवाहनाला साथ द्यावी, असेही राव यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.
ठामपा कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० सानुग्रह अनुदान
By admin | Published: October 30, 2015 11:49 PM