शिवसेना वैद्यकीय पथकाकडून केरळमध्ये १२ हजार रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:43 AM2018-08-28T04:43:30+5:302018-08-28T04:44:11+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार : मोफत औषधांचेही वाटप
ठाणे : शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या माध्यमातून केरळला दाखल झालेल्या ३० डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने केरळमध्ये गेले तीन दिवस पूरग्रस्तांना दिलासा देऊन तब्बल १२ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करून अडीच टन औषधे विनामूल्य दिल्याचा दावा पक्षाने केला आहे. याशिवाय कपडे, तांदूळ, डाळ, साबण, बिस्किटांचे पुडे आदी ५० टन सामानही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने नेले असून पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या विविध शिबिरांमध्ये या सामग्रीचे वाटप ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
अलेप्पी येथील एसडीव्ही स्कूल येथे शनिवारी, तर कनिचुलनगरा मंदिर येथे रविवारी महावैद्यकीय शिबिर आयोजिले होते. सोमवारी चेरु थाना गावातील पूरग्रस्तांच्या शिबिरात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी १२ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाने करून त्यांच्यावर औषधोपचार केले. साथीच्या आजारांची बाधा होऊ नये, यासाठी औषधे दिली. सर्दी-खोकला, व्हायरल ताप आदी आजारांच्या अधिक तक्रारी होत्या. अलेप्पीचे जिल्हाधिकारी सुहास यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडेही शिबिरार्थींसाठी वैद्यकीय मदत सुपुर्द केली.
केरळवासीयांसोबत साजरा केला ओणम
केरळमध्ये ओणम सणाचे माहात्म्य मोठे आहे. परंतु, यंदा पुराच्या पार्श्वभूमीवर कोणीही ओणम साजरा करण्याचा मन:स्थितीत नाही. हे ओळखून एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांच्या शिबिरात शिवसेनेच्या वतीने लाडूंचे वाटप करून त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला.