जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रथम वर्षासाठी प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. विद्यापीठाची ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइनद्वारे राबवत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातून १७ हजार ४४५ विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता केवळ पाच हजार ११३ विद्यार्थी इतकीच आहे. त्यामुळे उर्वरित १२ हजार ३३२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. डोंबिवलीत प्रगती, मॉडेल, पेंढरकर, मंजुनाथ ही पदवी महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेव्यतिरिक्त बॅँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, बीएमएस, बीएमएम, आयटी, कॉम्प्युटर सायन्स आदी विविध पदवीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कल्याणमध्ये बिर्ला, अग्रवाल, सोनावणे, मुथा ही महाविद्यालये आहेत. कल्याण-डोंबिवलीत कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. पण, त्या तुलनेत पदवी महाविद्यालये नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे. त्या तुलनेत महाविद्यालयांमधील जागा अत्यंत मर्यादित आहेत. १७ हजार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्या पुरेशा नाहीत. जेथे कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये एकाच ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी पदवी महाविद्यालयांत त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश मिळतो. त्यामुळे अन्य कनिष्ठ महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांना पदवी महाविद्यालयांत प्रवेश मिळताना अडचणी येतात. आॅनलाइन प्रवेशानुसार कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना मुंबई अथवा अन्य शहरांतील महाविद्यालयांमध्येही प्रवेश मिळू शकणार आहे. मात्र, या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. यापूर्वी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आसपासच्या ३० महाविद्यालयांचे पर्याय व नावे सुचवण्याची अट होती. यंदाच्या वर्षी आसपासच्या १० महाविद्यालयांची नावे विद्यार्थी सूचवू शकतो. पर्याय १० महाविद्यालयांचा असल्याने त्याला प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता कमी असल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात आहे. कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयांसह विद्यार्थी उल्हासनगरातील चांदीबाई, आर.के. तलरेजा कॉलेज, ठाण्यातील बांदोडकर, मुलुंडमधील वझे-केळकर व काही मुंबईतील बड्या कॉलेजची नावे सूचवू शकतात. सगळेच विद्यार्थी कल्याण-डोंबिवली शहरांतील महाविद्यालयांना पसंती देतीलच, असे नाही. कर्जत, नेरळ, खोपोली, आसनगाव तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील व्यावसायिक अभ्यासक्रम व इंजिनीअरिंगलाही काही विद्यार्थी पसंती देऊ शकतात. त्यामुळे १२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची तसदी होईलच असे नाही, याकडेही काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. अग्रवाल कॉलेजच्या उपप्राचार्या अनघा राणे यांनी सांगितले की, कला शाखेत पदवी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. पूर्वी विद्यापीठाची वर्षाला एकच परीक्षा होती. आता परीक्षा वाढल्याने अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांचा कल कमी होत आहे. यंदा निकाल मागच्या वर्षांच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला असल्याने कट आॅफ लिस्ट ही कॉमर्स व सायन्ससाठी अटीतटीची असणार आहे. कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांची ओढ अधिक आणि जागा कमी असल्याने कॉमर्ससाठीची चुरस जास्त जाणवेल. कला शाखेच्या शिक्षणाचा टक्का घसरला आहे. अन्य अभ्यासशाखेकडे तो वाढतो आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला १० जूनपासून प्रारंभ होत आहे. प्रवेशाची पहिली यादी २२ जूनला जाहीर होणार आहे. या यादीत नंबर लागल्यापासून प्रवेशासाठी तीन दिवसांत प्रवेश घ्यावयाचा आहे. दुसरी प्रवेशाची यादी २८ जूनला जाहीर होईल. १ जुलैला तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचा प्रवेश अर्ज आॅनलाइनला सबमिट केला, तर त्याला पुन्हा सुधारित अर्ज भरण्याची मुभा असल्याचे प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना त्याचे योग्य मार्गदर्शन महाविद्यालयाकडून मिळत नसल्याने त्यांना त्यांचा प्रवेश अर्ज बाद होण्याची चिंता सतावत आहे.
१२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची धास्ती
By admin | Published: June 10, 2017 1:04 AM